पुणे(प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधनकार्य चांगले आहे. त्यामुळे विद्यापीठाने एखादे क्षेत्र निश्चित करून त्यातील संशोधन आणि नवसंशोधनासंबंधी प्रस्ताव सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाला द्यावा. त्यासाठी केंद्र सरकार निश्चितपणे आर्थिक मदत करील, अशी ग्वाही केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेस द्वारा आयोजित वेबिनारमध्ये आज केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय स्टार्टअप्स आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी “एमएसएमई’ एक्सचेंजची स्थापना करीत आहे. ज्या उद्योगांची कामगिरी चांगली आहे, त्यांच्याकडून सरकार भाग घेईल, तसेच त्यांना शेअरच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. ज्यामुळे उद्योजकांना उद्योगाच्या सुरूवातीच्या टप्प्यात मदत होईल.
तसेच, स्टार्टअप्सनी देशास आवश्यक असलेले उपक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे. विशिष्ट अशा स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर उपयुक्त गोष्टी तयार होतील, शिवाय त्यामुळे लोकांचे कामासाठी होणारे स्थलांतर कमी होईल. त्याचप्रमाणे ग्रामीण आणि महत्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी छोट्या व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे आणि शहरांच्या ठिकाणी तेथील गरजा लक्षात घेऊन त्यानुसार तेथील नियोजन करायला हवे, असेही गडकरी म्हणाले.