अन्य कंपन्यांवर अवलंबून न राहण्याचा निर्णय
स्वत:ची परीक्षा यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार
तांत्रिक अडचणींच्या प्रश्नावर कायमचा तोडगा
पुणे – राज्यातील सर्वच विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा या आऊटसोर्सिंगद्वारे कंपनी अथवा एजन्सीद्वारे होत आहे. मात्र, भविष्यात ऑनलाइन परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता परीक्षेसाठी अन्य कंपन्यांवर अवंलबून न राहता स्वत:ची यंत्रणा उभारण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. पुढच्या सत्रातील ऑनलाइन परीक्षाही विद्यापीठाच्या विकसित केलेल्या यंत्रणेद्वारे होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्वानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षा ऑक्टोबरपर्यंत घेण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे विद्यापीठांना कमी वेळेत ऑनलाइन परीक्षा होण्यासाठी कंपन्यांची मदत घ्यावी लागली. त्यानुसार ऑनलाइन परीक्षा सुरू असून, ती अंतिम टप्प्यात येत आहे. मात्र कंपन्यांद्वारे होत असलेल्या परीक्षेत तांत्रिक अडचणींचा प्रश्न ऐरणीवर आला
आहे.
अशा परिस्थितीत चांगली पद्धतीने ऑनलाइन परीक्षेसाठी स्वत:ची सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी पुणे विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी प्रश्नसंच हा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी प्राध्यापकांना तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्याच्या ऑनलाइन परीक्षेत गणित विषयातील “आकृती’ प्रश्नसंचात दिसून येत नव्हते. तसेच काही परीक्षांचे टायटल, विषय एकसारखेच असतात. त्यामुळे परीक्षेत गोंधळ निर्माण होताना दिसतो. त्यामुळे प्राध्यापकांना तांत्रिक प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे परीक्षेत कोणताही अडचणी निर्माण होणार नाहीत. त्यादृष्टीने विद्यापीठाकडून प्रयत्न केले जाणार आहे.
अडचणी तत्काळ दूर होतील
आऊटसोर्सिंगद्वारे होत असलेल्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित कंपन्यांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी लागते. त्यांच्याकडून तत्परतेने त्रुटी दूर होतील, याची खात्री नसते. त्यामुळे स्वत:ची यंत्रणा असेल, तर तातडीने दुरुस्ती करणे शक्य आहे. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार आहे. सर्वच डाटा आपल्याकडे उपलब्ध होणार असल्याने परीक्षा योग्य पद्धतीने घेणे शक्य होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.