पुणे – राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर गुरुवारी आंदोलन मागे घेतले. शिक्षणमत्र्यांकडून आश्वासनाची 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्तता न झाल्यास 19 ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी विद्यापीठ बंद आंदोलन तीव्रपणे केल्याने, विद्यापीठाच्या सर्व कार्यालयांना कुलूप होते. त्यामुळे कुलगुरू, उपकुलगुरु, कुलसचिवांसोबत सर्व अधिकारी कार्यालयाबाहेर होते. गुरुवारी विद्यापीठ पूर्णत: बंद होते. त्याचा कामकाजावर परिणाम झाला.
गेल्या आठवडाभरापासून पुणे विद्यापीठासह सर्व विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू होते. त्यानंतरही काहीच मागण्या मान्य न झाल्याने गुरुवारपासून विद्यापीठ बंदची हाक दिली होती. पुणे विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या समोर ठिय्या आंदोलन करीत असून, घोषणा दिल्या. तसेच कोणत्याही कार्यालयाचे कुलूप उघडले नाही. त्यामुळे विद्यापीठातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर काही काळासाठी राहावे लागले.
सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जाहीर करून, तो तातडीने लागू करावा, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, पदोन्नतीबाबत तत्काळ निर्णय घ्यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी आंदोलन पुकारले होते. दरम्यान, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरुरून चर्चा झाली.
सामंत यांना करोना झाल्यामुळे त्यांच्यावर सुरू असलेले वैद्यकीय उपचार, अंतिम वर्षाच्या परीक्षा, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील स्थिती आदींचा विचार करून आंदोलन मागे घेण्यात आल्याचे समितीचे समन्वयक रमेश शिंदे यांनी सांगितले.