मुंबई विद्यापीठापेक्षा विस्ताराने ठरले सर्वांत मोठे
पुणे – राज्यात गुणवत्तेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वांत पुढे आहे. आता संलग्नित महाविद्यालयांची संख्या पाहता सर्वांत जुने विद्यापीठ म्हणून ओळख असलेले मुंबई विद्यापीठापेक्षाही पुणे विद्यापीठ विस्ताराने सर्वांत मोठा ठरला आहे.
या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या तब्बल 890 इतकी झाली आहे. तर मुंबई विद्यापीठाशी 823 महाविद्यालये संलग्न आहेत, अशी माहिती आकडेवारीतून समोर आली आहे.
पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पुणे, नाशिक आणि नगर या 3 जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. फेब्रुवारी 1949 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना होताना केवळ 18 महाविद्यालये संलग्नित होती. तेव्हा विद्यार्थी संख्या 8 हजार इतकी होती. गेल्या 70 वर्षांत पुण्याची ओळख ही शैक्षणिक हब म्हणून गणले जाऊ लागले. त्यामुळे पुण्यात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था व अभिमत विद्यापीठे उभ्या राहिल्या.
अभ्यासक्रम, गुणवत्ता, उपक्रमाच्या जोरावर देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचा क्रमांक लागतो. सध्या 890 महाविद्यालये असून, स्वायत्त महाविद्यालयांची संख्याही वाढत आहे. गेल्या काही वर्षांत पुणे शहरासह पुणे ग्रामीण, नगर व नाशिक येथून पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच विद्यापीठाने 32 महाविद्यालयांना परवानगी देऊन त्यांच्या अंतिम मान्यतेचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले आहेत.
मुंबई विद्यापीठाची स्थापन 1857 मध्ये झाली असून, देशातील सर्वांत जुन्या विद्यापीठापैकी हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात मुंबई, संपूर्ण कोकण व ठाण्यातील 823 महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र कोकण विद्यापीठ सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याने मुंबई विद्यापीठाचा भार कमी होणार आहे.
“महाविद्यालयांची संख्या वाढली म्हणून विद्यापीठ मोठे होत असले तरी त्यापेक्षा गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहे. अध्यापन, संशोधनावर अधिक भर दिला जात आहे. त्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ