प्रथम सत्र परीक्षा वेळेत होण्यासाठी तयारी सुरू
पुणे – सध्या लॉकडाऊनची चर्चा सुरू होत असली तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने वेळेत सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत. या परीक्षा वेळेत होण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयारी सुरू केली आहे.
पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनकडून ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत निर्णय झाला. मात्र, एज्युटेक फाउंडेशनची नव्यानेच निर्मिती झाल्याने, ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत पुरेसा अनुभव नाही. तसेच आवश्यक सॉफ्टवेअर व तंत्रज्ञानाची कमतरता पडू शकते. अशावेळी परीक्षेत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, यासाठी एज्युटेक फाउंडेशनने आयटी कंपनीचे सहकार्य घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेतून सर्वोत्तम आयटी कंपनीची निवड केली. या कंपनीने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती विद्यापीठाकडून घेतली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी “एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन’ आणि आयटी कंपनीकडून परीक्षा घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यात येत आहे. या परीक्षा विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाइल, लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब अशा साधनांचा वापर करुन देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या तयारीला सुरुवात करावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे