विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीसाठी पुणे विद्यापीठाचा पुढाकार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीसाठी शारीरिक शिक्षण विभागाने पुढाकार घेत “फिट मुव्हमेंट’ हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यापीठात प्रथमच अनोखा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यात 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम आणखी व्यापक करण्यासाठी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे.

सध्या देशभरात “फिट इंडिया’ मोहिमेविषयी जागृती केली जात आहे. या पाश्‍वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या संकल्पनेतून विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी “फिट मुव्हमेंट’ सुरू करण्यात आले. एक महिना मुदतीचा हा उपक्रम कालपासून सुरू करण्यात आला. यात प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुरुवातीला शंभर विद्यार्थ्यांचा प्रवेश देण्याची कल्पना होती. मात्र, 120 विद्यार्थ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे.

विद्यापीठात आतापर्यंत अशा पद्धतीचा उपक्रम झालेला नाही. या उपक्रमात मार्गदर्शन घेतलेल्या विद्यार्थ्यांतून आणखी प्रशिक्षक तयार करण्याचा मानस आहे. जेणेकरून हे विद्यार्थी आणखी विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन करतील. दरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून वर्षभरात तीन वेळा हा उपक्रम राबवण्याची कल्पना आहे. त्यातून किमान वर्षाला 300 विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीसाठीची जागृती निर्माण होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. दीपक माने यांनी दिली.

विद्यार्थ्यांना तंदुरुस्तीसाठी जागरुक करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

सहभागी विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मार्गदर्शन करत आहेत. सकाळच्या वेळेत या विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्तीसाठीचे व्यायाम शिकवले जातात. महिनाभरात गिर्यारोहण, निसर्गभ्रमंती, सायकलिंग असे उपक्रमही राबवले जातील,
– डॉ. दीपक माने, विभाग प्रमुख, शारीरिक शिक्षण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)