प्रॉक्टर्डपद्धतीने होणार परीक्षा : “एमक्युसी’द्वारे ऑनलाइन परीक्षा
अंतिम सत्र परीक्षेचा पॅटर्न बदलला; एकही परीक्षा ऑफलाइनद्वारे नाही
तांत्रिक पर्यायांसाठी विद्यापीठाची उपसमिती; एकूण 7 हजार 500 विषयांची ऑनलाइन परीक्षा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र (सेमिस्टर) परीक्षा गतवर्षीप्रमाणे ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने न होता फक्त ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहे. मात्र, अंतिम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. 50 गुण एमक्युसीद्वारे, तर 20 गुणांचा प्रश्न वर्णनात्मक असे 70 गुणांचा राहील. उर्वरित प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा 50 गुणांची संपूर्णपणे ऑनलाइन होणार आहे.
परीक्षा मंडळाची बैठक मंगळवारी झाली. यात सुमारे 6 लाख 50 हजार विद्यार्थ्यांची आणि सुमारे 7 हजार 500 विषयांची परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, यावर चर्चा झाली. त्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयी सांशक आहे. अशा परिस्थितीत ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.
यंदाच्या परीक्षेचा फॉर्म्युला बदलला
पदवीच्या प्रथम व द्वितीय आणि पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाची सत्र परीक्षा संपूर्णपणे ऑनलाइनद्वारे होतील. ही परीक्षा 50 गुणांची राहील. मात्र, अंतिम वर्षाची परीक्षा 50:20 या पॅटर्ननुसार घेण्याचा निर्णय झाला. यात 50 गुण वस्तुनिष्ठ, तर 20 गुणांची परीक्षा मात्र ऑनलाइनपद्धतीने टाईप करून द्यावी लागणार आहे. स्वत: कागदावर लिहून अपलोड करायची की अन्य पद्धतीने शब्द टाइप करायची, यासाठी तांत्रिक बाबींसाठी विद्यापीठाने उपसमिती नेमली आहे. समिती तीन दिवसांत अहवाल देणार आहे. त्यानंतर त्याचे स्वरुप स्पष्ट केले जाणार आहे.
परीक्षा प्रॉक्टर्डपद्धत
करोनाच्या पार्श्वभूूमीवर पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी सामूहिक पद्धतीने परीक्षा दिली. तसेच, ऑनलाइनचा निकालही वाढला आहे. त्याचा विचार करून योग्य पद्धतीने आणि बारकाईने प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. यात काहीच गैरप्रकार होणार नाही अशा पद्धतीने परीक्षा होतील, असेही परीक्षा विभागाने स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या परीक्षा 15 मार्चपासून
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्चपासून होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाची परीक्षा 30 मार्चपासून घेतली जाईल. जवळपास 50 दिवसांत या परीक्षा होतील. दोन टप्प्यात परीक्षा घेतला जाणार असून, प्रश्नपत्रिकेसाठी प्रश्नसंच करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
परीक्षेसाठी पाचच संधी
ऑनलाइन परीक्षा मोबाइल, लॅपटॉप अथवा संगणकद्वारे घेण्यात येणार आहे, याविषयी कोणतीच स्पष्टता नाही. मात्र, ऑनलाइन पद्धतीने लॉगिन व पासवर्ड टाकून प्रश्नपत्रिका खुली करायचे. परत पुन्हा बंद करायची. उत्तरे शोधून पुन्हा लिंक खुली करायचा, असा गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकदा लॉगइन केल्यानंतर तासभर तरी लिंक बंद करता येणार नाही. वीज अथवा अन्य कारणाने लिंक बंद पडली तरी पुन्हा उत्तरे देण्यासाठी जास्तीत पाचच संधी असतील, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.