पुणे, दि. 12 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सकाळी व सायंकाळी फिरायला आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना शुल्क सक्तीचे करण्याचा वाद्ग्रस्त निर्णय विद्यापीठ प्रशासनने घेतला होता.
या निर्णयावर सर्वच क्षेत्रातून विरोध होऊ लागल्याने अखेर पुणे विद्यापीठाला या परिपत्रकाला स्थगिती देण्याची नामुष्की ओढावली. एवढेच नव्हे, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही पुणे विद्यापीठाला या परिपत्रकास स्थगिती देण्याचे आदेश दिले.
विद्यापीठ आवारात सकाळी व सायंकाळी फिरायला नागरिक येत असतात. या नागरिकांसाठी एसपीपीयु ऑक्सी पार्क या योजना सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनने घेतला.
त्या अंतर्गत विद्यापीठात येणाऱ्या नागरिकांना मासिक शुल्क 1 हजार, सहामाही शुल्क साडेपाच हजार आणि वार्षिक शुल्क दहा हजार भरून सदस्यत्व घ्यावे लागणार आहे. त्यानुसार विद्यापीठात प्रवेश मिळणार असल्याचे परिपत्रक काल विद्यापीठ प्रशासनने प्रसिद्ध केले.
हे परिपत्रक प्रसिद्ध होताच सर्वच विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठवली. विद्यापीठाने त्वरित हे परिपत्रक मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोनन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला.
सर्व क्षेत्रातून विरोध होऊ लागल्याने त्यावर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करीत या परिपत्रकाला स्थगिती देण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनला दिले. त्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात येत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.