पुणे –करोनामुळे शैक्षणिक सत्र पुढे गेले आहे. अशातच परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेशास प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्यांदा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या परीक्षांचा निकाल तब्बल 18 दिवसांत प्रसिद्ध करून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परदेशातील शिक्षणास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
विद्यापीठाने अवघ्या 18 दिवसांत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला आहे. तब्बल 10 हजार 500 विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच विद्यापीठाने प्रसिद्ध केला आहे. विद्यापीठाशी संलग्न पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांतील तब्बल 6 लाख 18 हजार विद्यार्थ्यांनी द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यापीठातर्फे 12 जुलैपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात करण्यात आली.
परीक्षेला काहीसा विलंब झाल्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, विद्यापीठाने 31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याचे नियोजन केले. त्यानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
नियोजनपूर्वक कामामुळे 18 दिवसांत निकाल प्रसिद्ध करणे शक्य झाले. उर्वरित निकालासह आर्किटेक्चर, फार्मसी आदी अभ्यासक्रमांचे निकाल आठवडाभरात प्रसिद्ध होतील. परदेशातील शिक्षणासाठी गुणपत्रक हवे असणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून निकाल दिला आहे. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ