विद्यापीठाच्या सराव परीक्षा सोमवारपासून

ऑनलाइन परीक्षेची माहिती होण्यासाठी सराव परीक्षा घेण्यात येणार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या सेमिस्टरची ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी परीक्षा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या 10 तारखेपासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी या ऑनलाइन परीक्षेची माहिती होण्यासाठी विद्यापीठामार्फत दि. 5 ते 9 एप्रिल रोजी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.
गतवर्षीही करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

आता मात्र प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइनद्वारे होत आहे. विशेष म्हणजे मागील ऑनलाइन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांवर अंकुश ठेवण्याची कोणतीच यंत्रणा नव्हती. आताच्या परीक्षेत मात्र कॅमेऱ्याद्वारे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर लक्ष राहणार आहे. त्यासाठीच विद्यापीठाने ही परीक्षा “मॉक्‍टर्ड’ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन परीक्षेची संपूर्ण माहिती व्हावी, यासाठी परीक्षेमधील नमुना प्रश्‍नांवर आधारित सराव परीक्षा सोमवारपासून (दि.5) घेतले जाणार आहे. ही परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत होणार आहे. या सराव परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाइलद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे. तसेच परीक्षेसाठी www.sppuexam.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही विद्यापीठाने सूचित केले आहे.

संपूर्ण परीक्षांच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

विद्यापीठाची परीक्षा पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र विद्यापीठाने केवळ 75 टक्‍के अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. उर्वरित अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संपूर्ण परीक्षांच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहे. वेळापत्रक लवकरात लवकर प्रसिद्ध झाल्यास, त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करणे शक्‍य होणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परंतु विद्यापीठाने उर्वरित अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक टप्प्याटप्प्यानुसार प्रसिद्ध होणार असल्याचे म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.