पुणे – अस्वच्छता भोवली; सारसबाग येथील हॉटेल्सचे परवाने निलंबित

पुणे – हॉटेलची स्वच्छता करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही तसेच प्रशिक्षण देऊनही सारसबाग येथील चार हॉटेल्सने त्यामध्ये सुधारणा केली नाही. परिणामी, अन्न व औषध प्रशासन विभागाने सारसबाग येथील सात हॉटेल्सचा परवाना महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे.

ग्राहकांना स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सारसबागेतील खाऊ गल्लीला राज्य शासनाने “क्‍लिन स्ट्रीट फूड हब’ असा विशेष दर्जा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासनाने याबाबतची जागृती हॉटेलव्यवसायिकांमध्ये केली. या सर्व हॉटेलची तपासणी केली असता कचऱ्याचा डबा उघडा असणे, कामगारांनी ऍप्रन व हेडकॅप न वापरणे, भाज्या चिरण्याचा ओटा स्वच्छ नसणे, पाण्याची टाकी स्वच्छ नसणे, कामगारांची स्वच्छता नाही आदी त्रुटी आढळल्या होत्या. या त्रुटी दूर करण्याच्या सूचना देऊन त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या.

हॉटेल व्यावसायिकांना वारंवार आवाहन करूनही काही व्यावसायिकांनी यामध्ये सुधारणा केली नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीसा बजावली होती. या नोटीसीला सुध्दा हॉटेल व्यावसायिकांनी दाद दिली नाही. याविषयीचा खुलासा प्रशासनाकडे सादर केला नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने सात हॉटेलचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित केला आहे.

यापुढेही कठोर कारवाई
सारसबाग येथील व्यावसायिकांनी या खाऊ गल्लीस क्‍लिन स्ट्रीट फूड हब चा दर्जा देण्याबाबत गती मिळण्यासाठी सहकार्य न केल्यामुळे प्रशासनाने तपासणीच्या अनुषंगाने या सात हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे. उर्वरित हॉटेलच्या तपासण्या करण्यात येणार असून ज्यामध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. पी. शिंदे यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.