पुणे :नाट्य स्पर्धांवर अनिश्‍चिततेचे सावट

स्पर्धकांमध्ये नाराजी : करोनामुळे स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्‍यता

पुणे – दरवर्षी साधारण जूनमध्ये कला मंडळे, विद्यार्थी, नाट्य संस्था आदींचे लक्ष नाट्य स्पर्धांकडे लागलेले असते. मात्र, करोनामुळे या सर्व स्पर्धांमध्ये खंड पडला होता. त्यामुळे यंदा तरी स्पर्धा होतील, अशी आशा सर्वांच्या मनात आहे. मात्र, सद्य:स्थिती पाहता राज्य नाट्य स्पर्धांसह महाविद्यालयीन करंडक स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. परंतु, मागील वर्षीपासून स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंधने असल्याने आता कलाकारांना स्पर्धांच्या आयोजनाची प्रतीक्षा आहे.

दरवर्षी उत्साहात मे महिन्याच्या अखेरीपासून राज्य नाट्य स्पर्धांची तयारी होते. या अनुषंगाने लेखन, पटकथा, वाचनाची प्रक्रिया सुरू होते. मात्र, यंदा करोनामुळे स्पर्धांवर अनिश्‍चिततेचे सावट आहे. राज्य नाट्य स्पर्धांना ऑगस्टपासून सुरुवात होते. प्रवेशिका वितरित केल्यानंतर कागदपत्रे आणि प्रवेशिका जमा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येते. त्यानंतर स्पर्धक संस्थांना तारखांचे वाटप करण्यात येते. तर, स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम निश्‍चित झाल्यानंतर स्थानिक समन्वयांकडून स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

राज्यातील सुमारे 19 केंद्रांसह विविध ठिकाणी नोव्हेंबरपासून स्पर्धेचा शुभारंभ होतो. याशिवाय राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा घेण्यात येतात.

राज्य नाट्य स्पर्धेचे वातावरण उत्सुकतेचे आणि जबाबदारीचे असते. राज्य नाट्य स्पर्धेसारख्या मोठ्या व्यासपीठावर सादरीकरण करता येणार नाही. याचे काहीसे दु:ख आहे.
– ऋचा चिपळूणकर, कलाकार

दरवर्षी वेळापत्रकानुसार स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अद्यापपर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सद्य:स्थिती पाहता शासनस्तरावर स्पर्धांच्या आयोजनाबाबतचा निर्णय होणार आहे.
– बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय

अनुदान लवकर देण्याचा प्रयत्न
राज्य शासनाकडून देण्यात येणारे एप्रिल आणि मे महिन्याचे अनुदानदेखील रखडले आहे. ही रक्‍कम सुमारे 12 कोटी रुपयांच्या घरात आहे. या पार्श्‍वभूमीवर चवरे यांनी रखडलेले अनुदान लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.