कोथरूड – कोथरुड मतदार संघातील शास्त्रीनगर आणि कर्वेनगर येथील मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू होण्यास उशीर झाला. त्यामुळे याठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या. येथील अण्णासाहेब पाटील शाळेतील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या बिघाडामुळे अनेक मतदार मतदानासाठी तयार असताना, मतदान केंद्रावर उभे राहून वेळ वाया घालवत होते. इव्हीएम मशीन पुन्हा सुरळीत कार्यरत होण्यास वेळ लागत असल्याने काही लोक मतदान केंद्रावरून परत गेले. औंधमध्ये नाव पुरूषाचे आणि फोटो महिलेचा असे प्रकार समोर आल्यामुळे काही मतदारांना मतदान करता आले नाही.
मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू होण्यास उशीर झाल्याने यावर संताप व्यक्त करीत, नागरिकांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केला. आम्ही मतदान नियम मोडले तर कायदेशीर कारवाई केली जाते. मग तुम्ही मशीन बंद पडल्यावर बॅकअप ठेवायला नको का?” असा तीव्र सवाल तिने केला.
कोथरुड परिसरातील नागरिकांनी निवडणूक आयोगाला निवेदन दिले आणि मतदानाचा वेळ वाढवून देण्याची मागणी केली. आम्ही कामावर जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचलो, परंतु. मशीन बंद पडल्यामुळे वेळ वाया गेला. निवडणूक आयोगाने यावर तातडीने उपायोजना करायला हवी, अशी मागणीही मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.
आयोगाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह…
कोथरूड मतदार संघात निवडणूक आयोगाच्या यंत्रणेकडून वेळोवेळी माहिती मिळून मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि योग्य पद्धतीने कार्यवाही झाली नाही. तांत्रिक अडचणींना दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असताना दुर्लक्ष झाले. बॅकअप यंत्रणा, अधिक प्रशिक्षित कर्मचारी आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.