पुणे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या बॅनरवर छायाचित्र लावले नाही म्हणून तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार कोथरुड येथील शास्त्रीनगरमध्ये घडला होता. यातील मुख्य आरोपीसह दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने पवणाधरणाच्या डोंगराळ परिसरातून अटक केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत आरोपीला अटक केल्याने तणाव निवळला आहे.
ओंकार उर्फ आबा शंकर कुडले (रा.सागर कॉलनी, कोथरुड) असे अटक मुख्य आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अक्षय गायकवाड (22,रा.शास्त्रीनगर, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. ते रहात असलेल्या परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्यात आली होती.
या निमीत्त लावलेल्या बॅनरवर आबा कुडलेचे छायाचित्र नव्हते. यामुळे त्याने चिडून जाऊन हातात तलवार घेऊन येत दहशत माजवली. तलवारीने साउंड सिस्टीमचे नुकसान केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त भिमराव टिळे करत होते. दरम्यान आरोपी पवणाधरणाच्या परिसरात तुंग येथे लपून बसल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली. त्यानूसार पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक रवाना झाले. त्यांनी अतिशय दुर्गम आणि डोंगराळ परिसरात एका पाड्यात लपलेल्या आरोपीला साथीदारासह अटक केली.
ही कार्यवाही सहायक पोलीस आयुक्त सतीा गोवेकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस हवालदार शितल शिंदे, संजय आढारी, अंमलदार किरण ढवरे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अशोक शेलार, अमोल वाडकर, वैभव रणपिसे, मनोज सांगळे, सुधीर सोनवणे, शंकर संपते, राजेंद्र मारणे आणि सचिन अहिवळे यांनी केली.