पुणे – शहरातील दोघा सराईतांनी एका कॅब चालकाला चाकूचा धाक दाखवत कॅब पळवली. त्यानंतर रस्त्यात एका पादचाऱ्यासह तब्बल तीन वाहनांना उडविले. ही घटना रविवारी दुपारी अंडी उबवणी केंद्रानजीक घडली. याप्रकरणी दोघाही सराईतांना पोलिसांनी अटक केली आहे.
अक्षय भाऊसाहेब कोळे (१९, रा. पिरंगुट) यानी दिलेल्या तक्रारीनुसार मुस्तफा शफीक कुरेशी ऊर्फ मुस्सा (२०, रा. महंमदवाडी) आणि सिद्धांत चव्हाण (२०, रा. बोपोडी) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हा कॅबमध्ये एक पॅसेंजर घेऊन चालला होता. त्याची गाडी अंडी उबवणी केंद्राजवळ दोघांनी रस्त्याच्या मध्येच अडवली. त्यांनी अक्षय आणि पॅसेंजरला चाकूचा धाक दाखवून खाली उतरवले. त्यानंतर दोघे गाडीत बसून भरधाव वेगाने चालले. त्यांनी प्रथम एका पादचाऱ्यास उडवले.
नंतर दोन रिक्षांना उडवले. तेथून संचेती पुलावर ते सिग्नलपाशी आले असता, एका कारला जोरदार धडक दिली. यामुळे त्यांची कार थांबली. नागरिकांनी आरडाओरडा करून मुस्साला ताब्यात घेऊन पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी मुस्साला पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याने गाडी चोरल्याचे सांगितले. त्याचा साथीदार सिद्धांतचा शोध घेतला असता, तो घरीच सापडला.
यानंतर दोघांवरही खडकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून, दोघांवरही हाणामारीचे गुन्हा दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ करत आहेत.