पुणे – चोवीस तास पाणी योजनेतील टाक्‍यांचे काम बंद

सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना धरले वेठीस : राजकारण होत असल्याचा नगरसेवकांचा एकमेकांवर आरोप

पुणे – चोवीस तास पाणी योजनेचा डंका पिटवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या योजनेसाठी बांधण्यात येणाऱ्या टाक्‍यांचे कामच बंद पडले आहे. या विषयात राजकारण केले जात असून, नगरसेवकांनी एकमेकांवर आरोप करण्याला सुरुवात केली आहे.

ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले असताना चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील शहरातील दहा टाक्‍यांचे काम मागील दीड महिन्यांपासून बंद पडले आहे. तसेच, ज्या ठिकाणी टाक्‍यांचे काम झाले आहे, त्याठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आणि या टाक्‍यांना जोडणाऱ्या पाईपलाईनचे काम तांत्रिक कारणामुळे बंद अवस्थेत आहे. यासाठी राजकीदृष्ट्या एकमेकांवर आरोप केले जात असले तरी काही माननीयच या विलंबाला कारणीभूत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

पुणे महापालिकेने 2016 मध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजना मंजूर केली. डिसेंबर 2016 मध्ये पहिल्या टप्प्यात 84 पाण्याच्या टाक्‍यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यापैकी 12 ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणीमुळे काम रखडले आहे. तर उर्वरीत 70 ठिकाणी काम सुरू आहे.

दुसरीकडे ज्याठिकाणी टाक्‍या होणार आहेत. त्या जलकेंद्राशी जोडण्यासाठी मेन पाईपलाईनचे काम करण्यात येणार आहे. परंतु, प्रस्ताव मंजूर करत असताना या कामासाठीच्या “स्पेसिफिकेशन’मध्ये “स्पेलिंग मिस्टेक’ झाल्याने काम पुढे सरकू शकलेले नाही. आचारसंहिता संपल्यानंतरच हे काम सुरू होईल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

मागील दीड महिन्यांपासून काम बंद
नऊ ठिकाणचे काम मागील दीड महिन्यांपासून बंद पडले आहे. यामध्ये सिंहगड रस्त्यावरील वडगाव आणि हिंगणे येथील तीन, कात्रज येथील एक, पर्वती येथील दोन, कल्याणीनगर येथील एक, बाणेर येथील एक, सॅलसबरी पार्क येथील एक अशा नऊ टाक्‍यांच्या कामाचा समावेश आहे. तर स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागाच्या जागेमध्ये मेट्रो हबचे काम सुरू झाल्याने तेथेही दोन टाक्‍यांचे काम करण्यात येणार आहे. या नऊ ठिकाणच्या टाक्‍यांचे काम सुरू झाले आहे. अर्धवट अवस्थेत असतानाच काही लोकप्रतिनिधींकडूनच या कामांना वेगळ्याच कारणाने खोडा घातला जात असल्याने ठेकेदाराने तूर्तात तरी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

काम थांबले आहे ही वस्तुस्थिती आहे. तांत्रिक कारणामुळे दोन्ही कामे थांबवली असून, त्यातून लवकरच मार्ग काढून प्रकल्पाला गती देण्यात येईल.

– व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.