असे घडले पुणे : तुळशीबाग श्रीराम मंदिर

श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले हे पेशवाईतील कर्तबगार अधिकारी होते. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. पुण्यनगरीला वैभवशाली असलेले “तुळशीबागे’तील श्रीराम मंदिर हे नारो अप्पाजींच्या काळात बांधले गेले.

इसवी सन 1761 रोजी तुळशीबाग राम मंदिराच्या पायाचा मुहूर्त केला. सन 1765 मध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी घडवल्या. तुळशीबागेचे आवार सुमारे एक एकर आहे. उत्तर, दक्षिण आणि पश्‍चिम या तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सध्या मंदिरामध्ये असणारा सभामंडप 1884 साली श्रीमंत नंदरामजी नाईक यांनी बांधला. त्यानंतर त्यांनी बांधलेल्या शिखराला पुण्यनगरीचे भूषण म्हटले जाते. शिखरावर अनेक साधुसंतांच्या आणि पेशवेकालीन पोषाखातील मूर्ती बसविल्या आहेत. शिखर सुमारे 140 फूट उंच असून वरचा कळस सुमारे 4 फूट उंचीचा आहे. त्याला सोन्याचा पत्रा मढविलेला आहे. सन 1855 मध्ये देवाच्या गाभाऱ्याच्या मुख्य दरवाजाचे चौकटीस पत्रे बसविले आणि त्यावर चांदीचा मुलामा दिला.

मंदिराच्या बाहेरचा सभामंडप सुमारे 20 फूट उंचीचा असून यामध्ये तीन दालने आहेत. मंडपाचे छत लाकडी असून खांब आणि कमानी रेखीव आणि भव्य आहेत. मुख्य दालनामध्य संगमरवरी फरशी बसविलेली आहे. सभामंडपात मध्यभागी आणि गाभाऱ्यात जाणाऱ्या पायऱ्यांसमोर दोन ठिकाणी पूर्वी कारंजी होती. राम मंदिराच्या भोवती अनेक लहान देवालये आहेत. गणपती, विठ्ठल रखुमाई, शेषशायी भगवान, महादेव, मारूती आदी देवालये या आवारात आहेत.

राम, लक्ष्मण आणि सीतेच्य मूर्तीला सोन्यासह मोती आणि जडावाचे दागिने घातलेले आहेत. विशेषत: मोत्यांचे तुरे, तन्मणी, लफ्फा, रूद्रांची आणि नवरत्नांची कंठी, जडावाचा हार आदी अलंकार मूर्तीवर उठून दिसतात.

तुळशीबागेच्या उत्तर दरवाज्यातून देवळात येताना संगीत दरवाजा आहे. तिथेच नगारखान्याची इमारत आहे. हा नगारखाना प्रथम श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सुरू केला. श्रीरामाच्या दारी चौघडा तिन्ही त्रिकाळ म्हणजे पहाटे, सायंकाळी आणि मध्यरात्री वाजवण्यात येतो. तर दर शनिवारी तिसऱ्या प्रहरी म्हणजेच दुपारी 3 वाजता वाजविला जातो. पुणे पेशव्यांना शनिवारी तिसऱ्या प्रहरी मिळाले असल्याचे कारण यामागे सांगतात.

तुळशीबाग राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास बरीच वर्षे लागली. हे काम नरो अप्पाजींचे चिरंजीव रामचंद्र नारायण यांच्या वेळी पूर्ण झाले. हे मंदिर उभारण्यासाठी “तेव्हा’ 1 लाख 36 हजार 667 रुपये खर्च आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.