PUNE: शुद्ध केलेले सांडपाणी बांधकामांसाठी अयोग्य

पुणे – शहरातील बांधकामांसाठी प्रक्रिया करून शुध्द केलेले सांडपाणी वापरणे महापालिकेने मे २०२३ पासून बंधनकारक केले आहे. मात्र, या पाण्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक तसेच राहत आहेत. यामुळे बांधकामे कमकुवत होण्याची भीती बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
शहरातील बहुतांश बांधकाम व्यावसायिकांनी हे पाणी वापरणे बंद केले असून, या पाण्याचा वापर निम्म्याने घटला आहे. हे पाणी देण्यासाठी महापालिकेकडून शहरातील ७ ठिकाणी टॅंकर भरणा केंद्र सुरू केली आहेत. हे पाणी वापरणे बंंधनकारक केल्यानंतर आठवड्याला सुमारे ८०० ते ८५० टॅंकर घेतले जात होते. हा आकडा आठवडयाला ४०० वर आला आहे. त्यामुळे, बांधकामांना शहरात पुन्हा एकदा पिण्याचे पाणी वापरले जात आहे. त्यातच कमी झालेला पाऊस, तीव्र उन्हाळ्याच्या भीतीने यंदा आधीच उपलब्ध पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. त्यात बांधकाम व्यावसायिकांच्या भूमिकेने महापालिकेची डोकेदुखी वाढणार आहे.
शुद्ध केलेले पाणी वापरण्याचे बंधनकारक केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्लोरिन तसेच इतर रासायनिक द्रव्ये तशीच राहत आहेत. या पाण्याला दुर्गंध येत असल्याच्या तक्रारी आहेत. पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिका वापरत असलेली रसायने बांधकाम कमकुवत करू शकतात. त्यामुळे संबंधित बांधकामांच्या आरसीसी सल्लागारांकडून हे पाणी वापरण्यास नकार दिला जात आहे. यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत महत्त्वाची बैठक झाली.
या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेने दिलेले पाणी शुद्ध नसल्याचे सांगितले. तसेच पालिकेने पाणी शुद्ध केल्यानंतर त्याचे ओझोनेशन करून द्यावे, अशी मागणी केली. मात्र, ओझोनेशन खर्चिक असल्याने ते जमणार नाही असे पालिकेकडून या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे हे पाणी नावालाच शुद्ध होत असल्याचे समोर आले. या बैठकीला पाणीपुरवठा, बांंधकाम, विद्युत विभाग तसेच बांधकाम व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुन्हा एकदा होणार पाण्याची तपासणी
बांधकाम व्यावसायिकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर महापालिकेने शुद्ध केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता पुन्हा एकदा तपासण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासण्या पुढील आठ दिवसांत केल्या जाणार आहे. हे शुद्ध केलेले पाणी तसेच बोअरवेलचे पाणी तपासले जाणार आहे. या अहवालानंतर महापालिकेत पुन्हा बैठक बोलाविली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
बांधकाम व्यावसायिकांचे आक्षेप
– शद्ध केलेल्या पाण्याला दुर्गंध
– पाणी साठवण अडचणीचे
– पाण्यातील रसायनांममुळे बांधकामला गंज चढतो
– पाणी शुद्ध नसल्याने बांधकाम कमकुवत होण्याची भीती
– बांधकाम कमकुवत झाल्यास जबाबदार कोण?





