पुणे –सिंहगडावर पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागातर्फे ई-बस हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने वनविभाग प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांतर्गत सध्या बस पार्किंगसाठी जागेचा पर्याय निवडण्याचे काम सुरू असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली.
वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या सिंहगड विकास आराखड्यांतर्गत सिंहगडावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याबरोबरच गडावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गोळेवाडी ते सिंहगड यादरम्यान ई-बस प्रकल्प राबविण्याचे नियोजन वनविभाग आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) यांनी केले आहे. याबाबची प्राथमिक चाचणीसुद्धा घेण्यात आली आहे. या ई-बससाठी आवश्यक पार्किंग सुविधा निर्माण करण्यासाठी वनविभागातर्फे प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी परिसरातील विविध जागांबाबत विचार केला जात आहे. काही स्थानिक नागरिकांशी चर्चा करून, त्यांच्या मालकीच्या जागा भाडेतत्वावर घेण्याबाबतही विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
ई-बस पार्किंगसाठी वनविभागाला दोन एकर जागेची आवश्यकता आहे. वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरेल अशी पुरेशी जागा निश्चित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी काही ग्रामस्थांच्याही जागेचा विचार केला जात असून, याबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ही जागा भाडेतत्वावर घेतली जाणार असून, जागामालकाच्या संमतीनंतर त्यासंदर्भात करार करून तो पुढील संमतीसाठी जिल्हा नियोजन समितीपुढे सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील कामास सुरवात होईल.
– राहूल पाटील, उपवनसंरक्षक