3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी एकाच विभागात राहील्याने कार्यवाही
इतरांवर वाढीव कार्यभार सोपविण्याची परंपरा कायम
पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दोन कनिष्ठ व दोन वरिष्ठ लिपिक अशा चौघांच्या बदल्या झाल्या. तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी एकाच विभागात झाल्याने त्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या आहेत.
या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बरीचशी पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे हा वाढीव कार्यभार इतरांवर सोपविण्याची परंपरा आताही कायमच आहे. या कार्यालयात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याचा प्रस्ताव तयार करून तो नागरी सेवा मंडळात मंजूर केला होता.
करोनामुळे 15 टक्के कर्मचाऱ्यांच्याच बदल्या करण्यास मान्यता देण्यात येते. त्यानुसार शिक्षण आयुक्त कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या बदल्यास मंजुरी दिल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली.
या कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकाची पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात (डायट) बदली झाली. तर, दुसऱ्या लिपिकाची प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी विभागात करण्यात आली. दोन वरिष्ठ लिपिकांची बदली माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी विभागाच्या कार्यालयात झाली. सर्वजण बदली ठिकाणी रुजूही झाले. दोन शिपायांना पदोन्नतीही मिळाली आहे.
या कार्यालयातील आणखी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आगामी कालावधीत बदल्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कार्यालयातील रिक्त पदेही भरण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.