पुणे, प्रभात वृत्तसेवा : महंमदवाडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून या भागातील दोन डीपी रस्ते पीपीपी तत्वावर विकसित केले जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला असून त्यामुळे महंमदवाडीतून हडपसरकडे जाण्यासाठी आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. महापालिकेकडून शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी डीपी रस्त्यांचे रूंदीकरण तसेच मिसिंग लिंक जोडण्यात येत असून त्या अंतर्गत हे रस्ते केले जाणार आहे. दरम्यान, हे रस्ते विकसित झाल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याने बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच तातडीनं हे काम करण्याची मागणीही नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली होती.
महंमदवाडी स.न. 26,27 आणि 37 मधील 24 मी. डीपी रस्ता व कलव्हर्ट, व स.न. 38,40,41,55,56 मधून जाणारा 30 मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करण्याचे 26 कोटी रुपये खर्चून हा रस्ता विकसित केला जाणार आहे. तसेच या रस्त्यामुळे कोंढवा येऊन वडाचीवाडी येथे जाण्यासाठी नवीन लिंकरोडही उपलब्ध होणार आहे. तर सर्वे नंबर 26 ते 36 दरम्यान 24 मीटर रूंदीचा 600 मीटर लांबीचा आणि तिथून पुढे सर्वे नं 37 ते 40 दरम्यान, 300 मीटर रूंदीचा आणि 725 मीटर लांबीचा हा रस्ता असणार आहे. त्यामुळे या रस्त्याने या भागातील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
डीपी मध्ये दर्शविण्यात आलेल्या या रस्त्यांसाठी वांरवार पाठपुरावा सुरू होता. मात्र, मागील दोन वर्षांपासून करोना संक़टमुळे रस्त्यांसाठी तरतूद नव्हती. त्यामुळे, या भागातील कोंडी फोडण्यासाठी पालिकेने पीपीपी तत्वावर हा विकसित करण्याचा निर्नय घेतला असून लवकरच हे काम मार्गी लागणार आहे.
– नाना भानगिरे ( शहर प्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना)