Pune : केळकर रस्त्यावर सिमेंटचा मिक्सर रुतल्याने वाहतूक ठप्प

पुणे – शहराच्या मध्यवर्ती केळकर रस्त्यावर मुख्य चौकाजवळच गुरुवारी (दि. १०) वाळू  सिमेंटचे मिश्रण करणारा अवजड ट्रक  तीन फुटाहून अधिक खोल जमिनीत रुतल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी दोनच्या सुमाराला  दोन क्रेनच्या प्रयत्नाने हे वाहन बाहेर काढण्यात आले.

टिळक चौकापासून शहराकडे येणाऱ्या लक्ष्मी व कुमठेकर रस्त्यांवरील बहुतेक चौकात गेले महिनाभर खोदकाम सुरू आहे. जमिनीनंतर्गत पाईप लाईनच्या या कामामुळे रस्त्याच्या बहुतांश भागात मोठे खड्डे पडले आहेत.

गेले दिड महिने सुरू असलेल्या कडक निर्बंधांच्या काळात सर्वच रस्त्यांवरील  वाहतूक मंदावली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून हे नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे मंगळवारपासून ( दि. ८) मोठ्या संख्येने वाहने  रस्त्यावर आली.

मध्यवर्ती भागातील बहुतेक सर्व खोदलेले प्रमुख रस्ते, चौकात उभी असलेल्या अवजड क्रेन्स, पोकलेन मशीन, टिप्पर्स, मिक्सर्स, सगळीकडे पसरलेला राडारोडा आणि त्यातच गेले दोन दिवस झालेला मुसळधार पाऊस यामुळे वाहनचालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहने चालवणे भाग पडते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.