पुणे – स्वारगेट येथे “वाय’ आकाराचा उड्डाणपूल वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी उभारण्यात आला असला तरी यातून कुठलाही फरक पडला नसल्याचे सध्या चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून लक्षात येत आहे. सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी बसस्थानक आणि एस. टी. स्थानकामुळे या चौकात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यातून चौक ओलांडण्यासाठीही पादचाऱ्यांना 20 ते 25 मिनिटांचा वेळ लागतो. विशेष, म्हणजे या चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियोजन सिग्नल भरोसे सोडलेले असते, यातून वाहन चालक, प्रवासी, पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्वारगेट येथे एका बाजूला एस.टी. बसस्थानकाचे “इन गेट’ आहे तर पुलाच्या विरुद्ध बाजूला पीएमपी स्थानक आहे. या दोन्ही बाजूला अगदी कात्रजकडे जाणारा उड्डाणपूल जेथे सुरू होतो. तेथे रिक्षा, वडाप आणि इतर वाहने उभी असतात. एस.टी.स्थानकावर प्रवाशांना सोडविण्याठी आलेल्यांच्या दुचाक्याही येथेच जागा मिळेल तेथे उभ्या असतात. त्यात टिळक रस्ता, सातारा रस्ता आणि सोलापूर रस्त्याकडे वळणाऱ्या एस.टी., पीएमपी बसेस एकामागे एक खेटून जात असल्याने सिग्नल कोणत्याही दिशेने सुटला तरी या बसेस जाईपर्यंत वाहन चालकांना थांबावेच लागते.
एस.टी.कडून उपनगरांत व्यवस्था नाही : स्वारगेट एस.टी. बसस्थानकातील गर्दी वाढली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे बाहेर गावी जाणाऱ्या-येणाऱ्यांची स्थानकावर गर्दी वाढली आहे. यापूर्वी उन्हाळ्यात व दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवासी संख्या लक्षात घेत एस.टी. स्थानकांची तात्पुरती व्यवस्था उपनगरांमध्ये केली जात होती. परंतु, यावर्षी अशी व्यवस्था नसल्याने प्रवासी स्वारगेट स्थानकावर येत आहेत.