सरसकट लॉकडाऊनलाच व्यापाऱ्यांचा पाठिंबा

शहरातील दुकाने उद्यापर्यंत बंद


अंशतः लॉकडाऊन नकोच, आमच्या दुकानांमुळेच करोना पसरतो का? : महासंघ

पुणे – पुणे व्यापारी महासंघाने अंशत: लॉकडाऊनला विरोध केला असून, फक्त व्यापाऱ्यांनीच व्यवसाय का बंद ठेवायचा, असा सवाल उपस्थित केला आहे. सरसकट लॉकडाऊन लागू केल्यास पाठिंबा राहील, अशी भूमिका व्यापारी महासंघाने मांडली आहे. दि.14 एप्रिलपर्यंत शहरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे.

दोन दिवसांच्या टाळेबंदीनंतर शहरातील व्यवहार सोमवारी सुरू झाले. मंडईसह ठिकठिकाणी खरेदीसाठी गर्दी झाली. व्यापारी पेठांतील दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला असला, तरी शहरातील खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या, ई-कॉमर्स सुरू आहे. खाद्यपदार्थाच्या गाड्यांवर होणारी गर्दी प्रशासनाला दिसत नाही का? व्यापाऱ्यांच्या दुकानांतून करोनाचा प्रसार होतो का?, असा सवाल पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी उपस्थित केला.

शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ग्राहक हे व्यापाऱ्यांचे दैवत आहे. ग्राहक आणि व्यापारी बाधित झाल्यास त्याचा परिणाम होईल. पुणे करोनामुक्त करण्यास आमचा पाठिंबा आहे. मात्र, कारखाने, उद्योगधंदे, खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या, ई-कॉमर्स सुरू ठेवण्याची भूमिका योग्य नाही, असेही रांका यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.