पुणे – वारजे येथील अनंत अपार्टमेंट येथील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर एक चिमुकला बाल्कनीचा दरवाजा लॉक होऊन अडकला होता. अग्निशमन दलाने या बालकाची सुखरूप सुटका केली.
ही घटना बुधवारी दुपारी घडली. दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेचे दरवाजाचे लॉक अचानक लागल्याने हे बालक अडकले होते. त्यामुळे त्याचे आई-वडील घाबरले होते. दरम्यान, अग्निशमन दलाने बाळाच्या आई-वडिलांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. त्यानंतर शिडीच्या सहाय्याने सदर बाल्कनीत प्रवेश करत जाळीचे ग्रिल बोल्ड कटरच्या साह्याने तोडून बाळाला आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
या कामगिरीत वारजे अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक सागर सोनावणे व तांडेल शिवदास खुटवड व फायरमन संजय चौरे, मनोज गायकवाड, विकास ओव्हाळ यांनी सहभाग घेतला. या सर्व जवानांचे इमारतीतील रहिवाशांनी कौतुक केले आहे.