पुणे – रमजान ईदनिमित्त विविध ठिकाणी मशिदी आणि ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करुन ईद साजरी करतात. त्यावेळी होणारी वाहनांची गर्दी लक्षात वाहतूक विभागाकडून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आदी वाहनांशिवाय गोळीबार मैदान परिसरातील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात अथवा बंद करण्यात येणार आहे. दि. 5 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते नमाज पठण पूर्ण होईपर्यंत गोळीबार मैदान, ईदगाह परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग नमाजपठणाच्या वेळी बंद करण्यात येणार आहे. या ऐवजी गोळीबार चौकातून सीडीओ चौक, गिरीधर भवन चौकामार्गे सेव्हज लव्हज चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या ऐवजी लुल्लानगरकडून खाण्या मारुती चौक, खटाव बंगला चौक-मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक-भैरोबानाला या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या ऐवजी सॅलेसबरी पार्क-सीडीओ चौक-भैरोबानाला या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
सोलापूर रोडने मम्मादेवी चौक येथे येणारी वाहतूक गोळीबार चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे. या ऐवजी मम्मादेवी चौक – बिशप स्कूल किंवा कमांड हॉस्पीटलमार्गे सीडीओ चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथे बंद करुन एम्प्रेस गार्डन आणि लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे. या ऐवजी प्रिन्स ऑफ वेल रोडने किंवा भैरोबानाला-वानवडी बाजार चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणाऱ्या सर्व जड मालवाहतूक वाहने, खासगी प्रवासी बसेस, पीएमपी बसेसना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या ऐवजी लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.