पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार (दि.6) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आतापर्यंत संचालक पदाच्या 21 जागांसाठी 66 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तर 173 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत सहकार विभागातले अधिकारी व्यस्त असल्याचे कारण देत बॅंकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. यानंतर करोनामुळे या निवडणुका आणखी लांबणीवर गेल्या. त्यामुळे सध्याच्या संचालक मंडळाला वाढीव दीड वर्षांची संधी मिळाली.
आता बाधितांची संख्या कमी झाल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. दि.29 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्जांच्या संख्येवरून ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.