पुणे – मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस “टीओडी झोन’

दोन ते तीन दिवसांत निर्णयाची शक्‍यता


प्रकल्पाला निधी उभारण्यासाठी होणार मदत

पुणे – मेट्रो मार्गालगतच्या 500 मीटर प्रभाव क्षेत्रासाठी राज्य शासनाकडून येत्या काही दिवसांत “ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट’चा (टीओडी) निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक प्रशासकीय सूत्रांनी दिली. सुमारे दोन वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित होता.

नागपूर मेट्रोच्या धर्तीवर पुणे-पिंपरी चिंचवड शहरातही मेट्रो मार्गिकांलगतच दोन्ही बाजूस 500 मीटर अंतरावर “टीओडी झोन’ निश्‍चित केला जाणार असून या भागात बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदीनुसार, 3 ते 4 “एफएसआय’ अर्थात चटई क्षेत्र निर्देशांकापर्यंत अनुज्ञेय असणार आहे.

राज्य सरकारने शहराचा विकास आराखडा जानेवारी 2017 मध्ये मंजूर केला; पण मेट्रो मार्गिकांलगत “टीओडी झोन’ची निश्‍चिती केली नव्हती. त्यामुळे, शहरातील पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प रखडले होते. तर हा निर्णय होत नसल्याने सुमारे 32 चौरस किलोमीटर क्षेत्राची बांधकाम परवानगी “फ्रीज’ झाली होती. तर हा झोन ठरविताना, शहरातील पायाभूत सोयी-सुविधांवर ताण येण्याची भीती व्यक्त करत महापालिकेने मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस “टीओडी’ न राबविता फक्‍त मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिसरातच हे धोरण राबविण्यात यावे, अशी मागणी केली होती. तर, मार्गांच्या दोन्ही बाजूसांठी 500 मीटरपर्यंत “टीओडी’ क्षेत्र निश्‍चित करावे, अशी मागणी मेट्रो प्रशासनाने लावून धरली होती. तर नागपूरलाही याच पद्धतीने “टीओडी झोन’ निश्‍चित असल्याने दोन्ही शहरांसाठी वेगळे धोरण ठरविता येणार नसल्याने शासनाने 500 मीटर क्षेत्रापर्यंत “टीओडी झोन’ निश्‍चित केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

“एफएसआय’च्या उत्पन्नाचा काही भाग मेट्रोलाही
“टीओडी झोन’मध्ये रस्ता रुंदी आणि भूखंडाचे क्षेत्रफळ यानुसार कमाल 4 “एफएसआय’ वापरण्याची मुभा आहे. त्यानुसार, जागेच्या मंजूर क्षेत्रफळापेक्षा जादा “एफएसआय’ वापराचे प्रीमियम शुल्क पालिकेच्या तिजोरीत जमा करावे लागणार आहे. तसेच, “टीओडी झोन’मध्ये होणाऱ्या बांधकामांमध्ये परवडणाऱ्या घरांचे प्रमाण नगरविकास विभागाकडून निश्‍चित केले गेले आहे. दरम्यान, या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या जादा “एफएसआय’मुळे मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग मेट्रो प्रकल्पासाठीही दिला जाणार असला, तरी तो नेमका किती असेल या निर्णयानंतर स्पष्ट होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.