पुणे – शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करावी

पुणे विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक

पुणे – खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करावे, तसेच शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या.

खरीप हंगाम, पीक कर्ज व पीक कर्जांचे पुनर्गठन याबाबत पुणे विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक डॉ. म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात झाली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, रोहयो उपायुक्त अजित पवार, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे आनंद बेडेकर आदि उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, “मान्सून लांबणीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. पीक कर्ज वाटपाबाबत विशेष लक्ष द्यावे. कर्ज पुनर्गठनात लक्ष देऊन पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांना अडचण भासू देऊ नये. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गुणवत्ता नियंत्रणाअंतर्गत बियाण्यांची तपासणी करावी. शेती पंपांना वीज पुरवठा, टंचाई नियोजन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे व अन्य कृषी विषयक योजनांचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी बैठकीत घेतला. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा,’ असेही त्यांनी सांगितले.

सध्या बियाणे तसेच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून पिकांवरील अळीच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)