पुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी

गोळीबारामागचे रहस्य उलगडले :आरोपीच्या बॅगेत कोयते आणि चाकू

पुणे – सदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड हल्ला करुन आत्महत्या केलेल्या सिद्धराम कलशेट्टी हा त्या संपूर्ण कुटूंबालाच संपविण्याच्या उद्देशाने आला होता. त्याच्याकडील बॅगेत दोन कोयते आणि दोन चाकूही आढळून आले आहेत. त्याने तरुणावर अॅसिड हल्ला करुन गोळीबार केला होता. यानंतर समोरच्या इमारतीत लपून बसल्यावर शोध घेतलेल्या पोलिसांवरही गोळीबार केला. मात्र पोलीस त्याच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच स्वत:च्या कपाळावर गोळी झाडून इमारतीच्या डक्‍टमध्ये उडी घेतली.

या घटनेत रोहित विजय थोरात हा जखमी झाला आहे, त्याच्या मैत्रिणीने याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दुसरा गुन्हा पोलिसांवर गोळीबार केल्याचा आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे.

सिद्धराम विजय कलशेट्टी (23,रा.अक्कलकोट, जि.सोलापूर) हा अक्कलकोट येथील तेलाचा व्यापारी आहे. रोहितची आई ज्योतिषी असून त्यांची वेबसाइट आहे. या माध्यमातून तो संपर्कात आला होता. यानंतर रोहितच्या आईबरोबर त्याची फेसबुकवर मैत्री झाली. दरम्यान फेसबुकवर कलशेट्टीने अश्‍लिल मेसेज टाकल्यामुळे रोहितच्या आईने त्याच्याविरुद्ध 8 ऑक्‍टोबर 2018 मध्ये विनयभंगाची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी त्याला 12 डिसेंबर 2018 रोजी अटक केली होती. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडीही दिली होती या गुन्ह्यातून तो सध्या जामिनावर सुटला होता. तेलाचा व्यापारी तसेच समाजात प्रतिष्ठीत व्यक्ती असल्याने अटक झाल्याने त्याची बदनामी झाली होती. यामुळे तो दुकानात बसायचा नाही तो घरी किंवा देवळात बसायचा. अटकेमुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता. या रागातूनचे त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

या घटनेचा थरार सांगताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कलगुटकर यांनी सांगितले, “रोहित त्याच्या मैत्रिणीबरोबर रस्त्यावर बोलत उभा असतानाच आरोपी तेथे दाखल झाला. त्याने काही कळायच्या आतच रोहितवर अॅसिड फेकले. चेहरा भाजल्याने तळमळतच रोहितने तेथून पळायला सुरूवात केली. मात्र आरोपीने त्याचा पाठलाग करत त्याच्यावर गोळी झाडली. ही गोळी रोहितच्या पाठीत घुसली. दरम्यान, रोहितच्या मैत्रिणीने आरडा-ओरडा करत नागरिकांना जमा केले. हे नागरिक आरोपीच्या मागे येत असल्याने आरोपी जवळील एका इमारतीत घुसला. इमारतीच्या टेरेसवर गेल्यावर त्याला खाली मोठ्या प्रमाणात जमलेले नागरिक दिसले. यामुळे घाबरुन तो एका इमारतीच्या टेरेसवरुन दुसऱ्या व नंतर तिसऱ्या इमारतीवर गेला. तेथे तो डक्‍टवर असलेल्या जाळीवर थांबला. पोलिसांनी पहिल्या इमारतीच्या टेरेसवर धाव घेत त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस टेरेसवर पोहचताच आरोपीने त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. पोलिसांनी तातडीने आडोसा घेत आरोपीला शरण येण्याचे आव्हाण केले. यानंतर काही क्षणातच कोणीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. पोलिसांनी सावधपणे पाहिले असता, आरोपी डक्‍टमध्ये जखमी अवस्थेत पडलेला दिसला. इमारतीच्या डक्‍टला पहिल्या मजल्यावर स्लॅब होता. यावर तो पडलेला होता. यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली. त्याला बाहेर काढले असता त्याने कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.