पुणे – शहरातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता तसेच महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयांची यापुढे आयुक्त तसेच सर्व अतिरिक्त आयुक्तांकडून अचानक तपासणी केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यात प्रमुख्याने सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच प्रशासकीय कार्यालयांचीही तपासणी केली जाणार असून यावेळी अस्वच्छता तसेच कार्यालयीन कामकाजात विस्कळीतपणा आढळल्यास संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली.
आयुक्त म्हणाले, गुरुवारी मंडई येथे अचानक पाहणी केली असता, अनेक बाबी लक्षात आल्या. त्यात प्रामुख्याने मंडईचा परिसर सुमारे 12 एकर असूनही त्या ठिकाणी केवळ नियोजन नसल्याने तसेच योग्य पद्धतीने कामकाज होत नसल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, अतिक्रमणे होत आहेत, अशा प्रकारची शहरात अनेक ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी महापालिकेकडून स्वच्छता ठेवण्यात येत असल्याचे तसेच योग्य पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात मात्र अनेकदा वस्तूस्थिती वेगळी असते. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी यापुढे 3 अतिरिक्त आयुक्त तसेच आपण स्वत: महापालिकेच्या मिळकती, वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महापालिकेच्या शाळा अशा ठिकाणांची अचानक तपासणी केली जाणार असून तशा सूचना सर्वांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.