पुणे होणार क्वांटम तंत्रज्ञानाचे हब

निर्मिती आणि वापराच्या स्पर्धेत भारतही उतरणार

पुणे -जगातील सर्वात वेगवान संगणकीय तंत्रज्ञान म्हणून “क्वांटम तंत्रज्ञान’ ओळखले जाते. या तंत्रज्ञानाच्या निर्मिती आणि वापराच्या स्पर्धेत भारतही उतरत असून, आगामी काळात देशात क्वांटम तंत्रज्ञानाच्या वापराबाबतचा “रोड मॅप’ लवकरच तयार केला जाणार आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्‍यक शैक्षणिक, पायाभूत आणि व्यापारी सोयीसुविधा उभारण्यासाठी पुण्याची निवड झाली असून, याठिकाणी लवकरच क्वांटम तंत्रज्ञानाचे हब बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्‍नॉलॉजीचे (डीआयएटी) उप कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन यांनी सांगितले.

डीआयएटी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि जॉइंट ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी सेंटर यांच्या वतीने येत्या 2 ते 5 डिसेंबरदरम्यान क्वांटम तंत्रज्ञानाबाबत आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. “डीआरडीओ’चे अध्यक्ष सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत या चर्चासत्राचे उद्‌घाटन होणार आहे. या चर्चासत्राबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. रामनारायणन यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी संस्थेच्या डॉ. मनिषा नेने आणि माजी नौदल अधिकारी कमोडोर ए. के. सिन्हा उपस्थित होते.

डॉ. नारायणन म्हणाले, “भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी यांच्या मेळावर आधारित क्वांटम तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया ही राष्ट्रे विविध प्रयोग करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या वापराने संगणकाची साठवणूक क्षमता आणि शोधाचा वेग प्रचंड वाढेल. सद्यस्थितीत जे संगणक कोड सोडविण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागतो ते या तंत्रज्ञानाच्या सहायाने केवळ काही सेंकदात सोडविता येणे शक्‍य होणार आहे. विशेषता संरक्षणविषयक संसाधने, शस्त्रास्त्र यांच्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्‍त ठरत असल्याने या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्‍यक आहे.’

संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्रात या तंत्रज्ञाशी संबंधित तज्ज्ञ भारतात क्वांटम तंत्रज्ञान कशाप्रकारे आत्मसात करता येईल, याबाबत चर्चा करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

“डीआयएटी’त क्वांटम तंत्रज्ञानावर “एमटेक’ अभ्यासक्रम
देशात क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी कुशल व्यक्‍तिमत्त्व घडविणे आवश्‍यक आहे. यासाठीच “डीआयएटी’तर्फे क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित “एमटेक’ हा अभ्यासक्रम सुरू केला असून, आगामी शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमासाठी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश उपलब्ध असणार आहे, अशी माहिती डॉ. रामनारायणन यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.