फुरसुंगी – दाट लोकसंख्या असलेल्या हांडेवाडी-न्हावलेवस्ती परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य ड्रेनेज लाइन तुंबत आहे. त्याचे मैलापाणी मुख्य रस्त्यावर पसरत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तक्रार करूनही मनपा प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे पालिकेत येण्यापेक्षा आम्ही ग्रामपंचायतीतच बरे होतो, अशा शब्दांत नागरिक रोष व्यक्त करत आहेत.
हांडेवाडी गाव पालिकेत येऊन तीन-चार वर्षे उलटली, तरी रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज व आरोग्य या विधांसाठी वारंवार झगडावे लागत आहे. सुविधा मिळत नसूनही पालिकेचा कर मात्र नियमित भरावा लागत आहे. याबाबत विचारले असता पालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रतीक दळवी म्हणाले, “न्हावलेवस्ती येथील तुंबलेले ड्रेनेज लाइनची काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु येथे मुख्य लाइनमध्येच अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे येथे लाइन तुंबत आहे. आम्ही तातडीने पाहणी करुन दुरुस्ती पूर्ण करू.’
“मैलापाणी साचून दलदल तयार झाली आहे. यामुळे चालणेदेखील कठीण झाले आहे. तरीही, पालिका अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारुन नेत आहेत. या मैलावाहिनीची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.” – अशोक न्हावले, माजी उपसरपंच, हांडेवाडी.