पुणे- गणेशोत्सव काळात अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. या काळातील दहा दिवस शहर तसेच उपनगरांत पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे.
पुण्यातील गणेशोत्सवात राज्य, परराज्य तसेच परदेशांतून भाविक येतात. गर्दीचे नियोजन तसेच संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिनाभरापासून आखणी करण्यात आली.
यंदाच्या उत्सवात शहरात विशेषत: मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, विशेष शाखेचे उपायुक्त पी. राजा, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रमुख मंडळ परिसरात नियमित तपासणी
उत्सवाच्या कालावधीत साडेसात हजार पोलीस कर्मचारी, सातशे अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके तैनात राहणार आहेत. त्याबरोबरच राज्य राखीव दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची पथके शहरातील संवेदनशील ठिकाणे तसेच गर्दीच्या भागात साध्या वेशात गस्त घालणार आहेत. बॉंबशोधक-नाशक पथकाकडून मध्यभागातील मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळाच्या परिसरात नियमित तपासणी करण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन
मध्यभागातील प्रमुख मंडळांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहर परिसरात वेगवेगळ्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दीतील चोऱ्या, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी साध्या वेशात गस्त घालणार आहेत.