पुणे – वृक्षलागवडीसाठी तीन महिने मुदतवाढ

पुणे – राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या 33 कोटी वृक्षलागवडीसाठी यंदा लागवडीचा कालावधी वाढविण्यात आला असून, आता एक महिन्याऐवजी तीन महिन्यांची मुदत राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. वृक्षलागवडीचे उद्दिष्ट जास्त असल्याने कालावधीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या वनमहोत्सवांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. 1 ते 31 जुलै या दरम्यान करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची नोंद या वनमहोत्सवात केली जाते. आतापर्यंत दोन कोटी, चार कोटी आणि तेरा कोटी अशा विविध टप्प्यांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यंदा वृक्षलागवडीसाठी 33 कोटी रोपांची लागवड केली जाणार आहे. दरवर्षीपेक्षा यंदाचे उद्दिष्ट तब्बल अडीच पटीने जास्त असल्याने या लागवडीचा कालवधीदेखील वाढविण्यात आला आहे. यंदा वृक्ष लागवडीसाठी 1 जुलै ते 30 सप्टेंबर हा कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांनी दिली.

वृक्ष लागवड मोहिमेत शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे असते. विशेषत: शेतकरी वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. मात्र, याच कालावधीत पेरणीची कामे सुरू असल्याने बरेचसे नागरिक शेताच्या कामात व्यस्त असतात. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शेतीची बरीचशी कामे उरकून लोक वृक्षलागवडीच्या कामात सहभागी होतात. त्यामुळेच यंदा लागवडीचा कालावधी वाढविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.