पुणे – ‘चारा छावण्यांसाठी इच्छुकांनी निवेदन द्यावे’

पुणे – जिल्ह्यातील पाणी टंचाईबरोबरच चारा टंचाईचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याबाबत जिल्हा स्तरावर बैठक घेण्यात येणार असून, चारा छावण्या चालविण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे निवेदन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

जिल्ह्यात पाणी टंचाईपाठोपाठ चारा टंचाईचा प्रश्‍नही उभा राहिला आहे. एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल एवढाच चारासाठा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, जिल्ह्यात अनेक ठिकाणी चारा टंचाईचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यावर प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, चारा छावण्या कधी सुरू होणार असे प्रश्‍न पत्रकारांकडून जिल्हाधिकारी यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, चारा छावण्या सुरू करण्याबाबत जिल्ह्यातून काही खासगी संस्थांकडून 15 ते 16 प्रस्ताव आले आहेत. मात्र, ते फिजिकली शक्‍य नव्हते.

तसेच प्रत्यक्ष गावातून चारा छावण्या सुरू करण्याबाबत प्रस्ताव आले नाहीत. दरम्यान, जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर चारा टंचाईबाबत जिल्ह्यात पाहणी करून आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्‍यक त्या ठिकाणी छावण्या सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच, ज्या स्वयंसेवी संस्था चारा छावण्या चालवण्यासाठी तयार आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन द्यावे. तसेच, वेळोवेळी याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.