पुणे – यंदा प्रवेशाचा “कटऑफ’ घटणार

बारावीचा निकाल जाहीर होताच लक्ष कॉलेज प्रवेशाकडे

पुणे – राज्य शिक्षण मंडळाने बारावीचा मंगळवारी निकाल जाहीर केला. त्यानंतर पदवीच्या प्रथम वर्षासाठी महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. फर्गसनमध्ये बुधवारपासून (दि.29), तर बीएमसीसीचे दि. 30 मे पासून ऑनलाइन अर्ज उपलब्ध होतील. अन्य बहुतांश महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे प्रवेश अर्जास मूळ मार्कलिस्ट आल्यानंतर सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बारावीची मूळ (ओरिजनल) गुणपत्रिका कधी मिळणार आहे, याविषयी बोर्डाने अद्याप तारीख निश्‍चित केली नाही. त्यामुळे मूळ गुणपत्रिका मिळाल्याशिवाय प्रवेश सुरू कसा करावा, असा प्रश्‍न काही महाविद्यालयांपुढे निर्माण झाला आहे.

फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी म्हणाले, “फर्गसनमध्ये पदवी प्रथम वर्ष प्रवेश यंदाही ऑनलाइन होत आहे. विद्यार्थ्यांना बुधवारपासून संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जूनपर्यंत आहे. ही सर्व प्रवेश ऑनलाइन मार्कलिस्टवरून होतील. मूळ मार्कलिस्ट आल्यानंतर अर्जाची छाननी आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे (बीएमसीसी) प्राचार्य चंद्रकांत रावळ म्हणाले, “बीएमसीसी महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी दि. 30 जूनपासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 9 जूनपर्यंत आहे. त्यानुसार मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर अर्जात सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. पहिली गुणवत्ता यादी 17 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतरच प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, यावर्षी बारावी निकालाचा टक्‍का घटला आहे. अडीच टक्‍क्‍यांनी निकाल घसरला असून, त्याचा परिणाम महाविद्यालयाच्या प्रवेशावर होणार असल्याचे दिसून येत आहे. निकालानंतर वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. यावर्षी बारावीचा निकाल पाहता महाविद्यालय प्रवेशाचा कटऑफ घटण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.