पुणे – हवा प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे उपाय नाहीच

महापालिकेचे हात वर : देशभरात पुणे पहिल्या दहा शहरांत

पुणे – “शहरातील हवेचे प्रदूषण वाढत असल्याचे विविध अहवालांतून स्पष्ट झाले आहे. हे रोखण्यासाठी महापालिकेतर्फे दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही तातडीची उपाययोजना राबविली जात नसल्याचे सांगत महापालिकेच्या पर्यावरण विभागाने तुर्तास हात वर केले आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, “सफर’ अशा विविध संस्थाच्या पाहणीत पुणे शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. “पीएम 10′ आणि “पीएम 2.5′ हे शहराच्या हवेतील सर्वाधिक प्रदूषणकारी घटक असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते. “पीएम 10′ अथवा 2.5चे नियमानुसार प्रमाण 100/ पर क्‍युबिक मीटर असणे आवश्‍यक आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार फेब्रुवारीत हे प्रमाण 126.92 इतके होते. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालातदेखील देशातील सर्वाधिक हवा प्रदूषित शहराच्या यादीत पुण्याचा पहिल्या 10 क्रमांकमध्ये समावेश आहे. एकूणच शहराच्या हवेचे प्रदूषण वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

याबाबत महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दीघे म्हणाले, “हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल, वृक्षारोपण यांसारख्या दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र अजून तातडीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासंदर्भात एअर प्युरिफायर बसविण्याचा उपाय विचाराधीन होता. त्यासाठी काही संस्थांनी मदत करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र हे पंप कितपत उपयुक्त आहेत, याबाबत कोणत्याही संस्थेने प्रमाणित केले नव्हते. तसेच या यंत्रणांसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होणार होता. या सर्व गोष्टींचा विचार केला असता एअर प्युरिफायर हा सक्षम पर्याय न वाटल्याने महापालिकेने तो रद्द केला. यासंदर्भात सोलर पंप बसविण्यासाठी शोध सुरू आहे. तसेच “सीएसआर’च्या माध्यमातूनदेखील उपाय योजना राबविण्याचे आवाहन केले जात आहे.’

हवेच्या प्रदूषणाबाबत आवश्‍यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शिफारशीनुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुधार हाच एकमेव उपाय असल्याने त्यावर भर दिला जात असल्याचे महापलिकेने सांगितले आहे. त्यासाठी विविध प्रकल्पदेखील हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. याव्यतिरिक्त हवा शुद्धीकरणासाठी एअर प्युरिकिकेशन पंपदेखील बसवता येतील, मात्र अजून महापालिकेने केलेल्या तातडीच्या उपाययोजनांसंदर्भात आमच्याकडे माहिती नाही.
– दिलीप खेडकर, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंड.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)