महापालिकेच्या अंदाजपत्रकात सलग तीन वर्षे तरतूद; पण, कामच सुरू होईना
– सुनील राऊत
सिंहगड रस्ता – सिंहगड रस्त्यावर राजारामपूल ते वडगाव फाट्यापर्यंतची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. गेली सलग तीन वर्षे या पुलासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येत आहे. मात्र, सल्लागार नियुक्ती, सर्वेक्षण, निविदा यातच तीन वर्षे गेली आहेत. परिणामी, या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत आणखीच भर पडत आहे. त्यामुळे काहीही करा; पण या कोंडीतून दिलासा द्या, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.
सिंहगड रस्ता परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. महापालिकेच्या हद्दीबाहेर डोणजेपर्यंत लोकवस्ती वाढली आहे. तर, या भागात जाण्यासाठी दत्तवाडीपासून ते धायरीपर्यंत एकच रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांना प्रचंड प्रमाणात सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवकांनी या भागात उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती.
त्यानंतर स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी स्थायी समितीत पुढाकार घेत या पुलासाठी अंदाजपत्रकाची तरतूद करून घेतली, त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून केवळ सल्लागार नेमणे, सर्वेक्षण, निविदा प्रक्रिया करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. परिणामी गेल्या तीन वर्षांत या भागात लोकवस्ती आणखी वाढल्याने मुख्य नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत असून उड्डाणपूल तातडीने उभारावा अथवा पर्यायी रस्त्यांची रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला या पुलाची निविदा काढण्यात आली होती. मात्र, जादा दर आल्याने ती रद्द करून फेरनिविदा काढण्यात आली. त्याची मुदत संपत असतानाच करोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू झाल्याने या पुलाची निविदा पुन्हा रखडली आहे.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्थायी समिती सदस्य असताना स्वतंत्र तरतूद करून घेतली, त्यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, यंदा करोनामुळे कामाला उशीर झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांच्या कामात या आर्थिक वर्षातच हे काम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– मंजुषा नागपुरे, नगरसेविका
उड्डाणपुलाची निविदा रद्द झालेली असली तरी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू असून या वर्षी लॉकडाऊनमुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मात्र, प्रशासनाकडून पुढील काही महिन्यांत तातडीने हे काम सुरू करण्यासाठी आमच्या भागातील सर्वच नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत.
– ज्योती गोसावी, नगरसेविका