पुणे – शहर परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. शनिवारच्या तडाख्यानंतर रविवारीदेखील विविध भागांत पाऊस झाला. दरम्यान, येत्या 24 तासांत शहरात पावसाची शक्यता कायम आहे.
शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. यावेळी वाऱ्याचा वेग काहीसा वाढला होता. दुपारी शहर परिसरावर पावसाचे दाट ढग जमायला सुरवात झाली.
दुपारी चार वाजेपर्यंत खडकवासला, कात्रज, सिंहगड रस्ता परिसर, लोणी काळभोर, कोथरूड, अशा विविध भागांमध्ये जोरात तर मध्यवर्ती पेठा, शिवाजीनगर, येरवडा, बाणेर-पाषाण, पुणे स्टेशन या भागांमध्ये हलका पाऊस झाला. विभागाच्या नोंदीनुसार, शिवाजीनगर येथे 0.4 मिमी पाऊस पडला. तर आशय मेजरमेंट संस्थेच्या नोंदीनुसार, खडकवासला परिसर-12, कोथरूड-0.22 तर लोणी काळभोर येथे 20.8 मिमी पाऊस झाला.
“हवामानातील स्थानिक अस्थिरतेचा परिणामामुळे शहरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. उच्च तापमान आणि उच्च आर्द्रतेमुळे झालेल्या वातावरणीय क्रियाकलापामुळे शहरावर पावसाचे दाट ढग तयार झाले. रविवारी दुपारी शहर परिसरावर काहीशा तीव्रतेचे ढग साचले होते. परिणामी हा पाऊस होत आहे,’ असे हवामान विभागाने म्हटले आहे.