पुणे – करोना रुग्णांसाठी “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’चा वापर घरी करणे ज्याला समजले त्याच्यासाठी ते वरदान आहे; परंतु त्याचा वापर करणे आणि मुळात रुग्णाची ऑक्सिजनची गरज किती हे जर लक्षात आले नाही, तर मात्र जीवावर बेतू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ज्या व्यक्ती करोनातून बऱ्या झाल्या, परंतु फुफ्फुसातील जास्त संसर्ग आणि ऑक्सिजन लेव्हल पूर्ववत न झालेल्यांना घरी ऑक्सिजन सिलिंडर लावण्याविषयी सल्ला दिला जातो. त्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ वापरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर “प्रभात’ने तज्ज्ञांची मते जाणून घेतली.
सध्या अनेक संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, राजकारणी “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ उपलब्ध करून देत आहेत. काहीजण विनामूल्य तर काहीजण नाममात्र शुल्कामध्ये ते देत आहेत. मात्र, त्याचा वापर नेमका कसा करावा, कोणत्या स्थितीत असलेल्या रुग्णासाठी करावा, हे समजणे अत्यंत आवश्यक आहे.
एखाद्या रुग्णाचा ऑक्सिजन 85 टक्क्याच्या आसपास आहे आणि अन्य करोनाची अन्य लक्षणे तीव्र नाहीत तेव्हा या कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग होऊ शकतो. जर, कॉन्सन्ट्रेटर लावला आणि ऑक्सिजन लेव्हल 90 पर्यंत जाऊ शकत असेल, तर त्याचा सकारात्मक उपयोग आहे असे म्हणता येऊ शकते.
निर्जंतुकीकरण आवश्यकच
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरताना त्याचे निर्जंतुकीकरण अत्यंत आवश्यक आहे. मास्क, त्याचे ट्यूब्ज या सगळ्याची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि ते ठराविक कालावधीनंतर बदलणे हे महत्त्वाचे आहे. करोना काळातच नव्हे, तर कॉन्सन्ट्रेटर अन्य काही हृदय किंवा श्वसनाच्या रोगासाठी आधीपासूनच भाड्याने देण्याचे प्रकार होतेच. जेव्हा ते भाड्याने दिले जातात तेव्हाच तज्ज्ञ व्यक्तींकडून त्याचे निर्जंतुकीकरण करूनच ते वापरायला देणे आवश्यक आहे.
फुफ्फुसाच्या फायब्रोसिसमधूनही जे बऱ्यापैकी बरे झाले आहेत, अशांना आम्ही घरी सोडले तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुचवतो. मात्र, ते किती लिटर, किती तास, किती वेळ घ्यायचे हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. जसा औषधांचा असतो तसा ऑक्सिजनचाही ओव्हरडोस असतो. त्यामुळे ऑक्सिजनचाही योग्य डोस आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’चा एक फायदा असा आहे, की सिलिंडरसारखे त्याचे स्टोरेज करून ठेवायची गरज नसते. कॉन्सन्ट्रेटर हे हवेतील ऑक्सिजन गोळा करून देते. ते वापरणे सोपे आहे. शिवाय सिलिंडर घरी भरून ठेवणे अनेकदा आगीच्या दृष्टीने धोकादायक ठरते.
– डॉ. अपर्णा बिराजदार, उरोरोग तज्ज्ञ
“ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ची योग्य तांत्रिक माहिती सर्वांनाच असणे आवश्यक आहे. सर्वसामान्यत:
हे कॉन्सन्ट्रेटर 5 लिटर क्षमतेचे असतात. परंतु गळती वगैरे लक्षात घेता तीन लिटरच त्याचा उपयोग असेल. जर एखाद्या रुग्णाची ऑक्सिजनची गरज जास्त असेल आणि लक्षणे अधिक तीव्र असतील, तर त्याला याचा उपयोग होऊ शकणार नाही. या यंत्रासाठी “ऑक्सिजन वॉटर’ किंवा “डिस्टील वॉटर’च लागते. त्याचा समजून-उमजून वापर केला, ते व्यवस्थित स्वच्छ ठेवले तर ते वरदान ठरून जीवही वाचू शकतो.
– डॉ. नितीन अभ्यंकर,फुफ्फुसरोग तज्ज्ञ
करोनाच्या काळातील ऑक्सिजन तुटवडा आणि त्या अभावी होणारे रुग्णांचे हाल लक्षात घेता, समाजसेवा म्हणून आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत वापरण्यासाठी देण्याला सुरूवात केली आहे. ते देताना संबंधितांना त्याच्या वापरासंबंधाची माहिती दिली जाते. शिवाय प्रत्येकाला ते देताना त्याच्या ट्यूब्ज बदलून दिल्या जातात.
– सुनील माने, समाजसेवक