पुणे – थेंबे… थेंबे”ऑक्‍सिजन’ साचे!

-दररोज सरासरी9.42 टन ऑक्‍सिजनची बचत -महापालिका वाचवतेय शेकडोंचे "श्‍वास'

पुणे  -करोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने देशभरात ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मागील काही दिवसांपूर्वी पुण्यातही ऑक्‍सिजन टंचाई होती. तो मिळवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनाही दिवसरात्र धडपडावे लागत होते. मात्र, “बचत हीच निर्मिती’ या तत्त्वाचा पुरेपूर वापर करत महापालिका रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन वाचवण्यासाठी केलेल्या छोट्या-छोट्या उपाय योजनांचा नवा आदर्श घालून दिला आहे.

या उपाययोजनांमुळे महापालिका रुग्णालयांमधील ऑक्‍सिजनची बचत दिवसाला 9.42 टनांवर गेली आहे. हा प्राणवायू इतर रुग्णांसाठी वापरला गेल्याने त्यांनाही संजीवनी मिळाली आहे. शहरात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आणि एप्रिलच्या पहिल्या तीन आठवड्यांत करोना संकट अधिक गडद होते. या कालावधीत ऑक्‍सिजनची गरज भासणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढल्याने खासगी तसेच शासकीय रुग्णालयांनाही ऑक्‍सिजनचा तुटवडा होता.

तर, अचानक ऑक्‍सिजन संपल्यास अनेकांचे प्राण जाण्याची भीती असल्याने महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांसह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कित्येक दिवस-रात्री जागून काढल्या आहेत. दिवसाला 46 टन ऑक्‍सिजनची गरज असताना महापालिकेस दररोज कमी ऑक्‍सिजन मिळत होता. ही बाब लक्षात घेऊन ऑक्‍सिजनचा वापर कमी करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली.

त्यानंतर पालिकेच्या प्रमुख चार रुग्णालयात ऑक्‍सिजनचे ऑडिट करण्याचा निर्णय घेत, बचतीसाठी अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे महापालिकेस आता दिवसाला 9.42 टन ऑक्‍सिजनची बचत करता येणे शक्‍य झाले आहे. सुरूवातीला ऑक्‍सिजन बचतीचा प्रयोग पालिकेने जम्बो कोविड सेंटरमध्ये केला. त्यानंतर बाणेर, डॉ. नायडू हॉस्पिटल तसेच दळवी रुग्णालयातही ऑक्‍सिजन बचतीची मोहीम राबविली.

असा वाचविला ऑक्‍सिजन
रुग्ण जेवणाना, मोबाइलवर बोलताना, स्वच्छतागृहात जाताना ऑक्‍सिजन मास्क वापरत नाही. त्या कालावधीत कॉक बंद न केल्याने ऑक्‍सिजनचा अपव्यय होतो. जेव्हा रुग्ण चेहऱ्यावरून ऑक्‍सिजन मास्क काढतो, तेव्हा ऑक्‍सिजन पुरवठा लगेच बंद केल्याने बचत होण्यास सुरुवात झाली आहे. एका ऑक्‍सिजन बेडवरील रुग्णाला एका मिनिटाला पाच लिटर ऑक्‍सिजनची गरज असते. रुग्णाची दिनचर्या लक्षात घेता, दररोज साधारणपणे दोन तास ऑक्‍सिजन वाया जात होता. त्यावर प्रशासनाने नियंत्रण आणले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.