पुणे – सर्व नाट्यगृहांत यापुढे लाकडी विंग

कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर प्रशासनाला आली जाग

पुणे – नाटकाच्या सेटसाठी विंग काढण्याचे काम सुरू असताना जड विंग अंगावर पडून महानगरपालिकेचे रंगमंच सहायक विजय महाडिक यांचा मागील आठवड्यात मृत्यू झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत उशिरा का होईना महापालिका प्रशासनाने पुन्हा नाट्यगृहांत लाकडी विंग बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी सायंकाळी एका नाटकाचा शो असल्याने स्टेज सेटअपचे काम सुरू होते. नाटकाचा सेट मोठा असल्याने विंग काढाव्या लागत होत्या. म्हणून रात्री त्या काढण्याचे काम सुरू होते. विंग काढत असताना अचानकच सहा ते सात विंग खाली पडल्या व त्याखाली महाडिक सापडले गेले. विंगचे वजन जास्त असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दोन कर्मचारी त्यांच्या समवेत होते, मात्र ते बचावले. या प्रकारामुळे एका कर्मचाऱ्याचा जीव गेल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेत यापुढे असे अपघात टाळण्यासाठी पुन्हा लाकडी विंग बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाट्यगृह व्यवस्थापकांकडून भवन विभागास पत्र पाठविण्यात आले असून या विंग बदलून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, वारंवार विंग बदलाव्या लागत असल्याने नाट्यगृह व्यवस्थापकांनी यापूर्वी लाकडी विंग बदलून लोखंडी विंग बसविल्या आहेत.

महाडिक यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
महाडिक यांच्या कुटुंबीयांना महापालिका कामगार कल्याण निधीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अपघात विमा योजनेतून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून त्याच्या सर्वमान्यता पूर्ण करून ही मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.