पुणे – बेरोजगार उमेदवार उतरणार निवडणूक आखाड्यात

वर्गणीतून उभारणार पैसा : सोशल मीडियातून प्रचार


16 मतदारसंघातील उमेदवारांची निश्‍चिती

पुणे – उच्चशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्‍नांकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधण्यासाठी सेट-नेट पात्रताधारक, पीएच.डी., डी.टी.एड.-बी.एड. पात्रताधारक, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे उमेदवारांनी एकत्र येत लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणुकीसाठी लागणारा खर्चही वर्गणीतून गोळा करून उभा करण्यात येणार आहे. तसेच, फेसबुक, व्हॉट्‌सऍप, मेसेज आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराची रणनीती या उमेदवारांकडून आखली जात आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत पात्रताधारक संघटनांच्या प्रतिनिधींनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बैठक बोलाविली होती. राज्यातील सर्व 48 मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यापैकी 16 मतदारसंघांतील उमेदवार निश्‍चित करण्यात आले आहेत. डिपॉझिट भरण्याचा खर्च वर्णगी गोळा करून उभा केला जाणार आहे.

यासंदर्भात सेट-नेट पात्रताधारक समितीचे समन्वयक सुरेश देवडे म्हणाले, उच्चशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न तीव्र झाले असतानाही कुठल्याच राजकीय पक्षाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. उच्चशिक्षितांची शासनाकडून सातत्याने फसवणूक होत आहे.

या पार्श्वभूमीवर शासनापुढे आपल्या मागण्या तीव्रपणे मांडण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा, असे काही जणांना वाटत होते. मात्र बहिष्कार टाकून फार काही साध्य होणार नाही. त्यामुळे निवडणूक लढविण्यावर एकमत झाले. या निवडणुकीतील प्रचाराच्या निमित्ताने जास्तीत जास्त बेरोजगारांपर्यंत पोहचता येईल.
राज्यात पदवीधर बेरोजगारांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांचे मतदान जरी झाले, तरी पात्रताधारक उमेदवार आपले उपद्रव मूल्य निश्‍चित दाखवून देऊ शकतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×