पुणे : झोपी गेलेले नगरसेवक जागे झाले

पाच वर्षांत काहीच कामे न करणाऱ्यांची लगबग


कामे मंजूर करण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनवण्या

– सागर येवले

कोथरूड – ‘साहेब निवडणुका तोंडावर आल्या, आपल्या कामांची निविदा काढा की’, म्हणजे लगेच कामाला सुरवात करता येईल. “आपण केलेल्या कामांची यादी काढून ठेवा रे, अशी लगबग सध्या सर्व प्रभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात सुरू आहे. त्यासाठी महापालिका, क्षेत्रीय कार्यालयात नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या “फेऱ्या’ सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी तर मागील तीन वर्षांपासून केवळ इतरांच्या उद्‌घाटनाला दिसणारे लोकप्रतिनिधी यावर्षी प्रभागात विकासकामांची “गंगाच’ वाहणार आहे, अशा अविर्भावात फिरत आहे.

2017 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये काही लाटेवर तर काही विकासकामांच्या जोरावर नगरसेवक झाले. मात्र, त्यानंतर विकासकामांच्या जोरावर आलेल्या नगरसेवकांनी “सेवका’प्रमाणे कामांना सुरवात केली. मात्र, काही “नगरसेवक’ केवळ उद्‌घाटने, सर्वसाधारण सभा आणि बडेजाव करण्यातच दंग झाले. पहिले वर्ष यातच गेले. आश्‍चर्य म्हणजे काहींना तीन वर्ष कसे गेले हे कळलच नाही. त्यात मार्च 2020 मध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाला आणि वर्ष झपाट्यात संपले. आता, 12 महिन्यांत (2022) पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या विकासकामांची यादी तयार करण्यात लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली.

…आता मतभेद आणि श्रेयवाद
एखादा प्रश्‍न सोडविताना नगरसेवकांमध्ये श्रेयवाद सुरू झाला. याचा प्रत्यय कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये मागील 15 दिवसात अनेक घटनांतून समोर आला. एवढच नव्हे तर तत्कालीन नगरसेवकांनी प्रस्तावित केलेल्या विकासकामांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता ते काम मार्गी लावून श्रेय घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. काहींनी तर बोटावर मोजता येईल, एवढीच विकासकामे केली, मात्र भलीमोठी यादी प्रसिद्ध केली. त्यामुळे आपापसातील मतभेद वाढू लागले असून, समोरच्याने श्रेय घेण्याअधी त्याचे उद्‌घाटन व प्रसिद्धी करून घेण्याची धडपड लोकप्रतिनिधींची सुरू झाली आहे.

काम एकाचे; श्रेय घेतात सगळेच..
संपूर्ण पाच वर्षे आपले आहेत, असे म्हणून सत्कार, उद्‌घाटनामध्ये व्यस्त असलेल्या काही नगरसेवकांना आता आपण काही कामेच केली नसल्याचे लक्षात आले आहे. मात्र, चारच्या प्रभागात एखाद्या नगरसेवकाने केलेल्या कामाचे श्रेय अन्य नगरसेवक घेत असल्याचे दिसून येते. कारण, बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या विकासकामांचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये दोन ते तीन नगरसेवकांच्या अहवालामध्ये एकाच विकासकामाचा उल्लेख दिसून आला. त्यामुळे काम एकाचे तर श्रेय सगळ्यांचे, अशी गत झाली आहे.

धुळखात पडलेल्या वचननाम्यावरील धुळ “उडाली’
विकासकामे केली नाही तर जनतेला काय उत्तर द्यायचे. मागील निवडणुकीत आपल्या वचननाम्यामध्ये कोणती कामे करू, असे जनतेला सांगितले. त्यातील किती कामे मार्गी लागली आणि किती राहिली? त्यासाठी मागील चार वर्षांपासून धूळखात पडलेल्या त्या वचननाम्यावरील धुळ आता उडाली. मात्र, कामाची यादी पाहून लोकप्रतिनिधीच गडबडले असून ही कामे कधी करायची. या विचाराने महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना “साहेब, तुम्हीच आमचे तारणहार, तुमच्याशिवाय काम होणार का?’ अशी विशेषणे वापरून तेवढे आपल्या कामाच बघा की, ही विनंती केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.