अवघ्या दोन महिन्यांपूर्वी केले होते काम
पुणे – महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नवीन ड्रेनेज लाईन टाकून पूर्ववत केलेला मुख्य रस्ता खचल्याचे शनिवारी समोर आले. सणस मैदानासमोरील विश्व हॉटेलसमोराच हा प्रकार घडला. सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणतीही वाहने नसल्याने दुर्घटना टळली. दरम्यान, या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळविली आहे.
महापालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइन बदलण्याचे काम सुरू आहे. ते केल्यानंतर ठेकेदारांनी केलेली खोदाई व्यवस्थित करून नंतर रस्ता पूर्ववत करणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात लाइन टाकल्यानंतर केवळ माती आणि खडी टाकून रस्ता दुरूस्त केला जात आहे. त्यामुळे शहरात गेल्या काही महिन्यांत अनेकदा रस्ता खचल्याचे प्रकार समोर आले आहेत.
असाच प्रकार विश्व हॉटेलच्या समोर घडला आहे. शनिवार असल्याने सारसबाग तसेच सणस मैदानात आलेली अनेक वाहने या रस्त्याजवळ पार्क केली जातात. तसेच नागरिकही गर्दी करतात. त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकाराने थोडा गोंधळ उडाला होता. मात्र, येथे उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना हटवत तसेच महापालिकेसही ही माहिती कळवत रस्ता वाहतुकीसाठी बंद केला.