पुणे – शाळा व्यवस्थापनाला संस्थांच्या नियुक्तीचे अधिकार

शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यासाठी

पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत राज्यातील नागरी भागातील शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी संस्थांची निवड होईपर्यंत विद्यार्थ्यांना शिजविलेल्या पोषण आहाराचे वाटप करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात संस्था अथवा बचत गटांची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. 17 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ देण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या सहसंचालकांनी राज्यातील महापालिका आयुक्‍त्यांना बजाविला आहे.

शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीसाठी संस्थांची निवड करण्यासाठी सन 2012 मध्ये प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात कागदपत्रांच्या तपासणीद्वारे अंतिमरित्या पात्र झालेल्या संस्थांपैकी काही संस्थांनी पात्र संस्थांना केंद्रीय स्वयंपाकगृहाचे काम देऊ नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात सतत बचत गटांना कामासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीलाही आक्षेप नोंदविण्यात आलेले आहेत. त्यानुसार मागील वर्षी अन्न शिजवून देणाऱ्या संस्थांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात आली आहे.

काही शहरांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी संस्थांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी पुणे, मुंबई सारख्या काही शहरात अद्याप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. पुणे महापालिका हद्दीतील शांळासाठी 58 संस्थांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्यातील कागदपत्रांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र अद्याप संस्थांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालेले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत संस्थांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुण्यात तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.

केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी संस्थांची अंतिम निवड होण्यास वेळ लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अन्न शिजवून वाटप करण्यासाठी यंत्रणेची नियुक्ती शाळा व्यवस्थापनाच करावी लागणार आहे. गेल्या वर्षीची संस्था अथवा नवीन संस्था यांची निवड करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. पुरवठादारांमार्फत शाळांसाठी केवळ तांदळाचाच पुरवठा करण्यात येणार आहे. इतर धान्य वस्तू अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेने स्वखर्चाने खरेदी कराव्या लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.