पुणे – ग्राहक मंचाचा विमान कंपनीच्या विरोधात निकाल

पुणे – विमानाच्या वेळेत बदल झाल्याने गैरसोयीला सामोरे जात पती-पत्नीला इच्छीत स्थळापर्यंत पोहचण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागल्याप्रकरणात ग्राहक तक्रार निवारण मंचाने एअर एशिया या विमान कंपनीच्या विरोधात निकाल दिला आहे. पुन्हा प्रवासासाठी काढण्यात आलेल्या तिकीटाची रक्‍कम 9 टक्‍के व्याजाने परत देण्याबरोबरच नुकसान म्हणून 25 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्चापोटी 5 हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे. याबाबत सिंहगड रोड येथील हिंगणे खुर्दमधील निखील सुनील नाशिककर यांनी ग्राहक मंचात ही तक्रार दाखल केली होती.

दाखल तक्रारीनुसार, निखील नाशिककर आणि त्यांची पत्नी शितल यांनी एअर एशिया या विमान कंपनीची पुणे ते दिल्ली अशी तिकीटे बुक केली होती. पुण्यातून दिल्ली येथे जाण्यासाठी विमान 23 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी असताना सकाळी 4 वाजून 50 मिनिटाने विमान निघाले. परंतु, नशिककर दाम्पत्याला दिल्ली येथून लेहला जायचे होते. लेहसाठी जाण्यासाठीही त्यांना दिल्लीतून 5 वाजून 40 मिनिटांनी विमान होते. पुण्यातूनच विमानाला उशीर झाल्याने त्यांना लेहसाठी जाणारे विमान गाठता आले नाही.

दिल्लीसाठी जाण्यासाठी नाशिककर दाम्पत्य 22 तारखेला रात्री पावणे बारा वाजता विमानतळावर पोहचले. त्यांना फ्लाईट उशीरा असल्याचे समजल्यानंतर त्यांनी एअर एशियाच्या व्यवस्थापकाबरोबर बोलले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पर्यायाने त्यांची फ्लाईट उशीराने पोहचली. पर्यायाने त्यांना लेहसाठी जाण्याकरिता वेळेत पोहचता आले नाही. तक्रारदारांना प्रतिवादी विमान कंपनीचा वाईट अनुभव आला. लग्नानंतरच्या पहिल्या प्रवासात त्यांना असा अनुभव आल्याने त्यांची निराशा झाली. दिल्लीतून लेहसाठी जाण्याकरिता त्यांना पुन्हा 17 हजार 584 रुपये खर्च करावे लागले. त्यानंतर तक्रारदारांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली. दरम्यान, मंचाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.