पुणे : शाळांची जबाबदारी पालिकेकडेच

सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्‍सिमीटर पुरवावे लागणार


करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी सुविधा देणे आवश्‍यक


इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू होण्याच्या हालचाली

पुणे – राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा दि.23 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. करोना पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक सोयी-सुविधा उपलब्ध करून खबरदारीही घेण्यात येत आहे. ही जबाबदारी प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात पालिकेलाच या वस्तू शाळांना पुरवाव्या लागणार आहेत.

करोनानंतर शाळा सुरू होणार आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली होती. पण, प्रामुख्याने शाळांसाठी लागणाऱ्या वस्तू यात सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्‍सिमीटर पुरवण्याची जबाबदारी कोणाची? असा मुद्दा काही संस्थांनी उपस्थित केला होता. त्यावर आता राज्य शासनाने ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर ढकलली आहे.

शासनाच्या नियोजनानुसार, जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरी दि. 7 ते 20 नोव्हेंबरदरम्यान दिवाळी सुट्या आहेत. त्यानंतर लगेच प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शाळांनीही आपली तयारी ठेवली आहे. विद्यार्थी, पालकांना ऑनलाइनद्वारे सूचना देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून संमतीपत्रही घेण्यात येणार आहे. यादृष्टीने शाळास्तरावर नियोजन बैठकांचे सत्र सुरू आहे.

मार्गदर्शक सूचनांमध्ये सॅनिटायझर, थर्मल गन, पल्स ऑक्‍सिमीटर आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले आहेत.

शाळांसाठी सूचना
– शाळेचा परिसर दररोज स्वच्छ ठेवणे आवश्‍यक
– वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करण्यात यावे
– कचरा विल्हेवाट लावावी
– स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जंतुकीकरण
– स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता
– स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये
– मास्क वापर करावा. विद्यार्थी मास्क अदलाबदल करणार नाही, याची दक्षता घ्यावी
– विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दररोज थर्मल स्क्रिनिंग घेण्यात यावी
– शाळेच्या आवारात अन्य व्यक्‍तींना प्रवेश देऊ नये
– विद्यार्थी सूचनांचे पालन करत नसल्यास पालकांना सांगावे
– संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी स्वत: वाहनाने मुलास शाळेत सोडावे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.