पुणे – पुन्हा राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी

पुणे – महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर नेमण्यात येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या निवडी अखेर गुरुवारी झाल्या. 15 प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी 3 प्रमाणे 45 सदस्यांची नियुक्‍ती झाली असली तरी, हे सर्व राजकीय सदस्य असून कागदपत्रांची जुळवाजुळव करून अखेर त्यांचीच वर्णी लागली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने या निवडीसाठी अर्ज मागविले होते. त्यात 353 अर्ज आले होते. त्यातील अवघे 85 पात्र झाले होते. त्यावर अपात्र उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने त्यांची 12 जूनला सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर 268 अर्ज पात्र झाले तर 85 अर्ज अपात्र झाले होते. या सुनावनीलाही स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला होता.
अशा प्रकारे सुनावणी घेऊन अपात्र सदस्य पात्र करण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी ही प्रक्रिया पार पडली. त्यात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 3 जणांची निवड झाली असून 12 प्रभाग समित्यांवर भाजपचे कार्यकर्ते नियुक्‍त झाले असून 3 ठिकाणी राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे.

शिवसेनेला प्रभाग समितीतही स्थान नाही

येरवडा-कळस-धानोरी प्रभाग समितीवर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असून राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे या प्रभाग समितीमध्ये भाजपकडून 2 जणांना तर शिवसेनेकडून एकाला संधी दिली जाणार होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानावेळी भाजपच्या सदस्यांनी शिवसेनेच्या सदस्याला मतदान न करता राष्ट्रवादीच्या सदस्यांला नियुक्‍त केले. त्यामुळे शिवसेनेला प्रभाग समिती सदस्यातही भाजपची साथ न मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षात युती झाल्यानंतर शिवसेनेकडून सत्तेत वाटा मागितला होता. त्यात स्थायी समिती सदस्यांसह एक विशेष समिती अध्यक्ष आणि एक प्रभाग समिती अध्यक्षांची मागणी केली होती. त्यातील एकही पद शिवसेनेला मिळाले नाही तर आता प्रभाग समितीतही स्थान देण्यात आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.